
अभिनेत्याला निधनापूर्वी बाळाचा चेहरासुद्धा पाहता आला नाही.
कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे जून २०२० मध्ये निधन झाले. वयाच्या ३९ व्या वर्षी चिरंजीवी यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. चिरंजीवी सरजा यांच्या निधनाच्या वेळी त्यांची पत्नी मेघना गरोदर होती. त्यांना त्यांच्या मुलाचा चेहरासुद्धा पाहता आला नव्हता. मात्र आता त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या पाच महिन्यांच्या मुलाच्या हातून लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलर लाँचचा व्हिडीओ मेघनाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये चिमुकला चिरू आईच्या मांडीवर बसला असून आई मेघनाने त्याच्या हातून ट्रेलर लाँच केला आहे. चिरंजीवी सरजा निधनापूर्वी 'राजमार्तंड' या शेवटच्या चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यावेळी लॉकडाउन घोषित झाला आणि शूटिंग थांबवली गेली. मात्र तोपर्यंत चिरंजीवी यांनी चित्रपटातील त्यांचा भाग जवळजवळ पूर्ण केला होता. उर्वरित भागाची शूटिंग त्यांचा भाऊ ध्रुवा सरजाने पूर्ण केली.
हेही वाचा : लहान बाळासोबत करीना व तैमुर; काय आहे 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य?
पत्नी मेघना व चिरंजीवी आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहत होते. हे दोघं दहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मेघनासुद्धा अभिनेत्री आहे. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनदरम्यान २ जून २०२० रोजी चिरंजीवी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा : 'त्याच्या उत्साहाचा खून करू नका'; अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहानने फटकारलं
चिरंजीवी यांनी २००९ मध्ये ‘वायुपूत्र’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिररु या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.