सुतापा सिकदरने बोलून दाखवली पती इरफानची अपूर्ण इच्छा Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इरफान खान

दिवंगत इरफान खानला गायचं होतं 'तुम होती तो ऐसा होता'...

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे,व्यक्तिमत्त्वाचे चाहते जगभरात आहेत. दिवंगत इरफान खानही त्यापैकी एक. इरफान खानला जाऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय. कॅन्सरशी खूप दिवस झुंज दिल्यानंतर इरफानचं निधन झालं होतं. पण आज इरफान खान आपल्यात नसला तरी त्याच्या सिनेमांची आठवण काढणा-या फॅन्सची कमी नाही. त्याची पत्नी सुतापा सिकदरही इरफानसंदर्भातल्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करीत असते.

हेही वाचा: विकी कौशलला आली बालपणीच्या दहा बाय दहाच्या खोलीची आठवण!

आजही सुतापाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय,जी अर्थातच भावूक आहे पण इरफान संदर्भातली एक सुंदर आठवण म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातंय. सुतापा या पोस्टमध्ये म्हणते,''आज इरफानला जाऊन जवळ-जवळ दीड वर्ष झालं. पण आजही त्याच्या आठवणीनं अर्ध्या रात्री झोपमोड होते. फेसबुकवर आजही त्याच्या संदर्भातल्या आठवणींचा पूर ओसंडून वाहतोय. त्यामुळे मलाही इथं इरफानची एक अपूर्ण राहिलेली इच्छा आठवण म्हणून पोस्ट कराविशी वाटतेय. मला आठवतंय की आम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून शिकत होतो तेव्हापासून इरफान अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा फॅन होता. तो बच्चनजींचे बरेच संवाद हुबेहूब त्यांच्या स्टाईलमध्ये बोलून दाखवायचा. त्यानंतर इंडस्ट्रीत स्टारपद मिळवल्यानंतरही एके रात्री त्यानं मला बोलून दाखवलं,मला बच्चनजींचं सिलसिला सिनेमातलं 'तुम होती तो ऐसा होता' हे गाणं एकदातरी परफॉर्म करायचंय. पण त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली,तो आपल्यातून निघून गेला".

इरफानच्या 'करिब करिब सिंगल' या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज चार वर्ष झाली. त्यानिमित्तानं ही आठवण सुतापानं फेसबूकवर शेअर केली. त्या सिनेमातलं इरफानचं एक वाक्यही तिने आवर्जून पोस्टमध्ये नमूद केलंय. ''कुछ लोग इतने करिब होते है की उनके बिना भी वो जिंदगी मै करिब ही रहते है''. सुतापा सिकदर सिनेइंडस्ट्रीत आधीपासूनच कार्यरत आहे पण आता सुतापा आणि इरफानचा मुलगा बाबिलनंही इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून एन्ट्री केलेली आहे.

loading image
go to top