शेर ए-पंजाब

sher e punjab
sher e punjab

मालिकांचा ट्रेंड हा सासू-सून या विषयांकडून वेगवेगळे विषय हाताळण्याकडे येऊ लागला, पण वेगवेगळे विषय हाताळण्याच्या ओघातही कुठे तरी तोचतोचपणा येऊ लागला आणि गाडी पुन्हा घसरली सासू-सुनांच्या ट्रॅकवरच. मग या घरगुती मालिकांपेक्षा काय वेगळं करता येईल का? हा विचार झाला आणि मालिका निर्मात्यांनी ऐतिहासिक विषयांकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा ऐतिहासिक विषयांवर मालिका येत गेल्या. "जोधा अकबर', "भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप', "वीर शिवाजी', "चंद्रगुप्त मौर्य', "झांसी की रानी', "चक्रवर्ती सम्राट अशोक', "धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान', "पेशवा बाजीराव' अशा अनेक हिंदी मालिका आल्या; तर मराठीतही "राजा शिवछत्रपती' ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर असणारी मालिका येऊन गेली. हा सगळा आढावा कशासाठी? हा प्रश्‍न तुमच्या मनात नक्कीच आला असेल! तर हे सांगण्याचं निमित्त आहे लाईफ ओकेवर प्रदर्शित होणारी मालिका "शेर- ए- पंजाब'. या मालिकेत पंजाबचा राजा महाराणा रणजीत सिंगच्या कारकिर्दीचा सोनेरी पानांवर कोरला गेलेला इतिहास दाखविण्यात येणारेय. या मालिकेतून पुन्हा एकदा शालिन भानोत ऐतिहासिक मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याआधी त्याने "सूर्यपुत्र कर्ण' या ऐतिहासिक मालिकेत दुर्योधनाची भूमिका केली होती. शालिन आता महाराणा रणजीत सिंगच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तो या मालिकेबद्दल म्हणाला की, "महानगरांतील मुलांना त्यांच्या देशाचा इतिहास आणि संस्कृती यांची माहिती असणं आवश्‍यक असल्याने टीव्ही मालिकांच्या विषयातील हा बदल स्वागतार्ह आहे. तसंच ही मालिका महाराजा रणजीतसिंग यांच्या कार्याची आणि या महान शीख योद्‌ध्याची माहिती देणारी आहे. या मालिकेच्या विषयात वास्तव चुकीचं दाखविलं जाऊ नये म्हणून संशोधकांची मोठी टीम आमच्याकडे आहे. या मालिकेच्या विषयासाठी सखोल अभ्यास करण्यात आलाय. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलीय. अर्थात, आम्हीही माणसंच आहोत आणि चुका या माणसांकडूनच होतात.' या मालिकेसाठी शालिनला खूप मेहनत घ्यावी लागलीय. मुख्य म्हणजे पंजाबी भाषेतील लहेजा शिकून घ्यावा लागला. तो या तयारीबद्दल बोलताना म्हणाला, "ही माझ्यासाठी सर्वांत आव्हानात्मक भूमिका आहे. मला पंजाबी येत नाही. त्यासाठी मी एका पंजाबी भाषा शिक्षकाची नियुक्ती केली. मुंबईत असा शिक्षक शोधणं हेही माझ्यासाठी आव्हानच होतं. नवीन भाषा शिकण्यात मजा जरी येत असली, तरी कधी कधी कंटाळा येतो. त्यातील अस्सी, तुस्सी यासारखे शब्द उच्चारणं त्याचा वापर करणं जड जात होतं. मी नऊ दिवस घराबाहेरच पडलो नाही. त्या नऊ दिवसांत मी अनेक पंजाबी चित्रपट आणि गाणी ऐकत होतो. आता त्यात मी बऱ्यापैकी पारंगत झालोय असं वाटतं, पण सर्वांत कठीण काम घोडेस्वारी शिकण्याचं होतं. त्यामुळे मी पुरता त्रासून गेलो.' शालिन आता या मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहे. त्याची ही मेहनत "शेर- ए- पंजाब' या मालिकेत लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com