esakal | माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लोकार्पण सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

planet marathi

माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लोकार्पण सोहळा

sakal_logo
By
- संतोष भिंगार्डे

ती येणार म्हणून सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. ती येणार आणि काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. फुलांची सुंदर सजावट, ढोल ताशांचा गजर, राजेशाही थाट, अशा उत्साहवर्धक वातावरणात 'ती'ची दिमाखदार एंट्री झाली आणि तिने येताच उपस्थितांची मने जिंकली. अशी ती म्हणजे लाखो हृदयाची धडकन मराठी मुलगी धकधक गर्ल माधुरी दीक्षित Madhuri Dixit. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या Planet Marathi OTT लोकार्पण सोहळ्यात माधुरी दीक्षितने हजेरी लावली. मागील काही महिन्यांपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम देत 'प्लॅनेट मराठी ओटीटी' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. माधुरी दीक्षितच्या हस्ते 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी ओटीटी'शी जोडली गेली आहे. या भव्य कार्यक्रमाला 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख संस्थपक अक्षय बर्दापूरकर यांच्यासह 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारातील आणि मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज तारे-तारकांनी हजेरी लावली होती. यापूर्वीच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणारा 'जून' चित्रपट प्रदर्शित झाला असून यापुढे प्रेक्षकांना 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सीरीज आणि काही मनोरंजनात्मक आणि दर्जेदार चित्रपट पाहता येणार आहेत. मनोरंजनाचा हा खजिना वेब सीरीज, वेबफिल्म्स आणि चित्रपटांपुरताच मर्यादित नसून हळूहळू प्रेक्षकांना 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या जादुई पोतडीतून नवनवीन कंटेन्ट मिळणार आहे.

हेही वाचा: केबीसीमध्ये जाणं पडलं महागात, तीन वर्षांची इंक्रिमेंट थांबवली...

'प्लॅनेट मराठी ओटीटी' बरोबरच्या या नव्या नात्याबद्दल अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितले, ''जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या टीमने उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे मराठी इंडस्ट्री एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. मराठी चित्रपटात खूपच क्षमता आहे, जी अजून जगभरातील प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जो खजिना आणला आहे, तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. हा माझा सन्मान आहे, की या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणे, हा खरोखर अद्भुत अनुभव होता. मी सुद्धा एक अशी मराठी प्रेक्षक आहे, जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी मराठी चित्रपट, वेबसिरीज आवर्जून पाहाते. माझ्या मते, 'प्लॅनेट मराठी ओटीटी' हे असे आहे, ज्याची जगभरातील मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते.''

'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आज इतक्या महिन्यांची आमची मेहनत फळाला आली आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांच्या भेटीला येत असून दुग्धशर्करा योग म्हणजे माधुरी दीक्षित सारखी गुणी अभिनेत्री 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या परिवारात सहभागी झाली आहे. त्यामुळे विशेष आनंद आहे आणि यासाठी मी तिचा आभारी आहे."

loading image
go to top