एक जादूगार.. 10 मिनिटे आणि 12 लघुपट

टीम ई सकाळ
सोमवार, 10 जुलै 2017

अमेय श्रद्धा सारंग उर्फ एव्हीएस या आभासकारांची (इल्युजनिस्ट) तिसऱ्या पिढीच्या वारसदाराने जादुई क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. अमेय यांनी जादुगार, इल्युजनिस्ट, मेंटालिस्ट, एस्केप आर्टिस्ट म्हणून १६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम, ३ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, युथ आयकॉन ऑफ मॅजिक, फास्टेस्ट (वेगवान) एस्केपिस्ट आणि ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.

मुंबई : अमेय श्रद्धा सारंग उर्फ एव्हीएस या आभासकारांची (इल्युजनिस्ट) तिसऱ्या पिढीच्या वारसदाराने जादुई क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. अमेय यांनी जादुगार, इल्युजनिस्ट, मेंटालिस्ट, एस्केप आर्टिस्ट म्हणून १६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम, ३ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, युथ आयकॉन ऑफ मॅजिक, फास्टेस्ट (वेगवान) एस्केपिस्ट आणि ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.
 
जादू आणि मनोरंजन यांची सांगड घालून १० मिनिटांचे १२ लघुपट तयार करण्याची सारंग यांची योजना आहे. भारतीय जादुगारांची प्रतिमा बदलून ती वेगळ्याच उंचीवर नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
 
विविध संकल्पनांवरील १२ लघुपटांसाठी सारंग तयारी करत आहेत. प्रत्येक लघुपट एका दिवसात चित्रीत करण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण मालिका १२ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल आणि या माध्यमातून अनेक विक्रम स्थापित करण्यात येतील. या सर्वच्या सर्व म्हणजे १२ लघुपटांची संकल्पना आणि निर्मिती अमेयझिंगसारंग यांचीच आहे. यात नाट्य, रोमांच, रोमान्स, रहस्य, अॅक्शन, भयपट, भावनाप्रधान इत्यादी संकल्पनांचा समावेश आहे. प्रत्येक लघुपटात जादू हा घटक अंतर्भूत असणार आहे. हा घटक कथेच्या अनुषंगाने येईल.
 
जादू ही कला एका मोठ्या मंचावर नेण्यासाठी अमेयझिंगसारंग आता मनोरंजनाच्या जगात प्रवेश करत आहे. भारतीय जादुगारया मायावी चित्रपट जगतातसुद्धा आपले वर्चस्व गाजवू शकतो, हेच त्यांना सिद्ध करायचे आहे. यात कसलीच कसर राहू नये यासाठी अमेयझिंग यांनी अनुपम खेर यांची अॅक्टिंग अकादमी, शामक दावर यांची एसडीआयपीए ही संस्था आणि वामन केंद्रे यांच्या नाट्य प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेतले.  
 
जादू ही कला केवळ स्नेहसंमेलनांपुरतीच मर्यादित न राहता या कलेला इतर कलांप्रमाणे मानाचे स्थान मिळावे हा सारंग यांचा हेतू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जादुगारांना जो सन्मान मिळतो, तसाच सन्मान मिळविण्यासाठी भारतीय जादुगार प्रयत्नांची पराकाष्ठा करतात  अमेयझिंगसारंग यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि मनोरंजन विश्वात पाऊल ठेवून जादुगारांबद्दल हरवलेला आदर परत मिळवून देण्यास ते सज्ज झाले आहेत.
 
पहिला लघुपट हा अखिल मातांना समर्पित असेल आणि एका लघुपटातून सामाजिक संदेशही देण्यात येईल. देशातील शेतकऱ्यांची विदारक अवस्था या माध्यमातून ठळकपणे दाखवून देण्यात येणार आहे. ज्यांना अजूनपर्यंत आपली कला दाखविण्याची संधी मिळालेली नाही, अशा उदयोन्मुख जादुगारांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जादुगार मनोरंजन आणि जादूच्या क्षेत्रात कशा प्रकारे तग धरून राहू शकतो, हे दर्शविण्यात येणार आहे.”, असे जादुगार सारंग म्हणाले.
 
जगातील महान जादुगार दिवंगत चंदू द ग्रेट यांचे नातू असलेल्या अमेय यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा जपला आहे. त्यांनी स्थापन केलेला प्रत्येक विक्रम हा ओरिजिनल होता आणि त्यात त्यांचे कौशल्य पणाला लागले होते. सारंग यांनी अभिनय आणि नृत्य याचेही प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या या कल्पक कौशल्यांचा उपयोग करून त्यांना आपल्या जागतिक विक्रमांमध्ये भर घालण्याची इच्छा आहे.
 
आतापर्यंत तुम्ही अभिनेत्यांना चित्रपटांमध्ये जादुगार होताना पाहिले असेल पण आता तुम्ही जादुगाराला चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या रूपात पाहणार आहात.

Web Title: magic shortfilms esakal news