ऑन स्क्रीन : मुंबई डायरीज २६/११ : भ्याड हल्ल्याची धारदार गोष्ट

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बेतलेली आठ भागांची ‘मुंबई डायरीज’ ही वेब सिरिज अनेक अर्थांनी नावीन्यपूर्ण आहे.
mumbai diaries 26/11
mumbai diaries 26/11Sakal

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बेतलेली आठ भागांची ‘मुंबई डायरीज’ ही वेब सिरिज अनेक अर्थांनी नावीन्यपूर्ण आहे. मुंबई हल्ल्यासंदर्भातील पोलिसांची, माध्यमांची व काही प्रमाणात अतिरेक्यांची (काळी) बाजू अनेक माध्यमांतून प्रेक्षकांसमोर आली आहे, मात्र त्या रात्री डॉक्टरांना जखमींवर उपचार करताना कराव्या लागल्या संघर्षाची कहाणी फारशी मांडली गेली नव्हती. ही कमतरता निखिल अडवानी दिग्दर्शित ‘ॲमेझॉन प्राइम’वरील ही सिरिज भरून काढते. दिग्दर्शन, कलाकारांना अभिनय, संकलन व संगीत या सर्वच आघाड्यांवर या वेब सिरिजनं छान कामगिरी केली आहे. गोष्ट सांगताना काही गोष्टी गृहित धरल्यानं सत्याचा विपर्यास झाला आहे, ही त्रुटी जाणवते.

‘मुंबई डायरीजची’ कथा २६ नोव्हेंबरच्या रात्री बॉम्बे जनरल हॉस्पिटलमध्ये (मूळचे कामा हॉस्पिटल) सुरू होते. कौशिक ओबेरॉय (मोहित रैना) हा तडफदार डॉक्टर त्याच्या हातून झालेल्या मोठी चुकीतून सावरत असतानाच अचानक अनेक जखमी रुग्ण दाखल होऊ लागतात. कौशिकच्या मदतीनं त्याच दिवशी ट्रेनी म्हणून नेमणूक झालेले तीन डॉक्टर व सोशल सर्व्हिस डायरेक्टर चित्रा दास (कोंकणा सेन-शर्मा) मोठ्या प्रयत्नांनी रुग्णांवर उपचार सुरू करतात, मात्र काही वेळानं अतिरेकी याच हॉस्पिटलवर हल्ला करतात. मानसी हिराणी (श्रेया धन्वंतरी) ही धडाडीची पत्रकार हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवते. परस्परांत मतभेद असताना, जवळचे नातलग शहरात अडकलेले असताना ही टीम मोठ्या धैर्यानं रुग्णांना सावरत अतिरेक्यांचा सामना कसा करते, याची खिळवून ठेवणारी गोष्ट या आठ भागांच्या मालिकेत सादर होते.

या कथेत पात्र व ठिकाणांची नावं बदलली आहेत, मात्र प्रत्येक स्थळ प्रेक्षकांच्या ओळखीचं आहे. कथेमध्ये केवळ भारतीयांना सोयीच्या गोष्टी न दाखवता हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुकांचीही माहिती दिली आहे. चुका पोलिसांकडून, डॉक्टरांकडून, माध्यमांकडूनही झाल्या. त्या मान्य करून अतिरेक्यांचा बीमोड कसा झाला, याची कथा मालिका मांडते. हल्ल्यानंतरच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या अनेक प्रसंगांचा उल्लेख मालिकेत येतो. मात्र, हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूममध्ये घडणारे नाट्य, संघर्ष, डॉक्टरांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा प्रेक्षकांना हेलावून सोडते. प्रत्येक प्रसंगाचा, घटनेचा हवा तसा अर्थ आपण काढू शकतो, मात्र दिग्दर्शकाला डॉक्टरांची बाजू मांडायची आहे व ती प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचली आहे. यात संकलकानं अनेक ठिकाणी होत असलेले हल्ले व त्याच्या केंद्रस्थानी असलेले रुग्णालय दाखवताना केलेली कामगिरी सर्वाधिक कौतुकास्पद.

मोहित रैनानं साकारलेला डॉक्टर जबरदस्त. वैयक्तिक आयुष्यात संघर्ष सुरू असताना आपलं कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरची भूमिका तो जगला आहे. कोंकणा सेन-शर्मानंही अशाच प्रकारची भूमिका नेहमीच्या सफाईनं साकारली आहे. मृण्मयी देशपांडेनं ट्रेनी डॉक्टरची भलीमोठी भूमिका ताकदीनं पेलेली आहे. संदेश कुलकर्णी, श्रेया धन्वंतरी, टिना देसाई, प्रकाश बेलावडी, सोनाली कुलकर्णी आदींना त्यांना चांगली साथ दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com