ऑन स्क्रीन : मडी : मड रेसिंगचा (बुळबुळीत) थरार | Muddy Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Muddy Movie
ऑन स्क्रीन : मडी : मड रेसिंगचा (बुळबुळीत) थरार

ऑन स्क्रीन : मडी : मड रेसिंगचा (बुळबुळीत) थरार

‘फास्ट ॲण्ड फ्युरिअस’ या हॉलिवूडच्या चित्रपट मालिकेनं प्रेक्षकांना तुफान वेग पकडणाऱ्या कार आणि त्यांची शर्यतीची ओळख करून दिली. हिंदी चित्रपटांमध्ये ‘धूम’ या मालिकेनं त्यांची थोडीफार नक्कल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार रेसिंगवरील चित्रपटांची आपल्याकडं तशी वानवाच आहे. डॉ. प्रभागल दिग्दर्शित ‘मडी’ हा मल्याळम चित्रपट ही उणीव (काही अंशी) भरून काढतो. चित्रपट चिखलातील कार रेसिंगचं विश्‍व मोठ्या संशोधनातून आणि प्रयत्नांतून बेमालूमपणे उभं करतो, मात्र पटकथेवरचं दुर्लक्ष आणि अभिनयातील कच्चेपणा यांमुळं चित्रपट पुरेसं समाधन करीत नाही.

‘मडी’ची कथा आहे मुथू (युवान कृष्णा) या तरुणाची. जंगलात आपल्या जीपमधून लाकडाची वाहतूक करणं, हा त्याचा व्यवसाय. कार्थी (रिधान कृष्णा) हा त्याचा चुलत भाऊ, मात्र अनेक वर्षांपासून त्यांच्यात विस्तव जात नसतो. कार्थी मड रेसिंगमध्ये करिअर करीत असतो आणि त्यात जिंकण्यासाठी त्याला टोनी (अमित नायर) याच्याशी सतत स्पर्धा करावी लागत असते. त्यांच्यातील वैर कॉलेजपासून सुरूच असतं. मुथू आणि कार्थीचा जंगलातील लाकडाच्या वाहतुकीवरून वाद सुरू असतो. मड रेसिंगमधील एका शर्यतीत टोनी कार्थीला पराभूत करतो आणि त्याचा अवमानही करतो. ही शर्यत पाहायला आलेल्या मुथूला ही गोष्ट जिव्हारी लागते आणि तो कार्थीची मदत करण्याचा निर्णय घेतो. अंतिम लढतीच्या आधी टोनी व कार्थीमध्ये पुन्हा संघर्ष पेटतो आणि त्यात कार्थी जायबंदी होतो. या परिस्थितीत मुथू आपल्या भावाची पत राखण्यासाठी मड रेसिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतो. या जीवघेण्या शर्यतीत अनेक चढ-उतार येतात, सर्वांचीच जिवाची बाजी लागले. यात जय कोणाचा होतो, हे चित्रपटाचा थरारक शेवट सांगतो.

हेही वाचा: मंदिराला फेऱ्या का मारते? प्रश्नावर सारा अली खाननं दिलं उत्तर...

चित्रपटाच्या कथेत नावीन्य नसलं, तरी मड रेसिंगची पार्श्‍वभूमी असल्यानं ती पहिल्यापासून पकड घेते. हा रेसिंगचा प्रकार भारतीयांसाठी तसा नवीनच आहे आणि त्यातील महाकाय गाड्या व त्यांचा थरार तुम्हाला जागेवरून हलू देत नाही. एका तळ्याच्या बाजूनं, ओढ्या-नाल्यांतून, कच्च्या रस्त्यांवरून धावणाऱ्या या गाड्या जेव्हा हवेत उडतात, तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. या शर्यतींचं चित्रण आणि त्यातील थरार दिग्दर्शकानं छान टिपला आहे. पटकथेत मात्र खूपच चुका राहिल्या आहेत. चित्रपटाचा नायक नक्की कोण हेच समजत नाही व नायक अचानकच खलनायकासारखं वागायला सुरुवात करतो, तेव्हा प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. युवान व रिधान हे दोन्ही नायक तगडे आहेत व रेसिंगमध्ये शोभून दिसतात, मात्र ते अभिनयाच्या नावाखाली फक्त खुनशी नजरेनं पाहण्याचं काम करतात. हाणामारीचे प्रसंग जोरदार असले, तरी खरे वाटत नाहीत. चित्रपटाचं संगीतही खूपच कर्णकर्कश आहे. ॲमेझॉन प्राइमवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

एकंदरीतच, मड रेसिंगसारखा वेगळा विषय हाताळणारा हा चित्रपट मनोरंजक असला, तरी इतर सर्वच आघाड्यांवर तोकडा पडल्यानं तो ‘बुळबुळीत थरार’ ठरतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top