बुरसट विचारांवरचा जोरदार ‘फ्लश’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

टॉयलेट - एक प्रेमकथा

‘बीबी पास चाहिये, तो घरमें संडास चाहिये....’ ही देशातील स्वच्छता अभियानाशी जोडलेली थीम घेऊन आलेला ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’ हा अक्षयकुमार व भूमी पेडणेकरच्या भूमिका असलेला चित्रपट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालतो. चटपटीत संवाद, अभिनय व संगीताच्या जोरावर हवा तो संदेश योग्य पद्धतीनं पोचवत स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करतो. मात्र, माहितीपटाचा जीव असताना लांबत गेलेली पटकथा व त्यामुळं प्रसंगांत आलेला तोच तोपणा यांमुळं काही ठिकाणी निराशाही करतो.

टॉयलेट - एक प्रेमकथा

‘बीबी पास चाहिये, तो घरमें संडास चाहिये....’ ही देशातील स्वच्छता अभियानाशी जोडलेली थीम घेऊन आलेला ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’ हा अक्षयकुमार व भूमी पेडणेकरच्या भूमिका असलेला चित्रपट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालतो. चटपटीत संवाद, अभिनय व संगीताच्या जोरावर हवा तो संदेश योग्य पद्धतीनं पोचवत स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करतो. मात्र, माहितीपटाचा जीव असताना लांबत गेलेली पटकथा व त्यामुळं प्रसंगांत आलेला तोच तोपणा यांमुळं काही ठिकाणी निराशाही करतो.

‘टॉयलेट ः एक प्रेमकथा’ ही केशव (अक्षयकुमार) या उत्तर प्रदेशातील एका खेड्यातील कर्मठ ब्राह्मणाच्या मुलाची ही कथा. वयाची पस्तीशी ओलांडली, तरी मंगळ असल्यानं त्याचं लग्न अडलंय. एका म्हशीशी लग्न लावून त्याचे वडील हा मंगळ घालवण्याचा प्रयत्न करतात, मात्र सहा बोटं असलेली मुलगी असल्याशिवाय लग्न होणार नाही असंही सांगतात. जवळच्या गावातील खूप शिकलेली (राज्यात पहिली आलेली) जया जोशी (भूमी पेडणेकर) केशवच्या आयुष्यात येते आणि अनेक क्‍लृप्त्या करून दोघं विवाहबद्ध होतात. मात्र, पहिल्याच दिवशी घरात संडास नसल्यानं सुशिक्षित जया बिथरते, सासऱ्याशी भांडते आणि काहीच होत नाही हे लक्षात आल्यावर केशवला सोडून जाते, थेट घटस्फोटासाठी अर्ज करते. संडासमुळं एक लग्न तुटल्याची बातमी मीडियापर्यंत पोचते आणि राज्यभर गोंधळ माजतो.

स्वच्छतागृहांमधील भ्रष्टाचार, नव्या सरकारची भूमिका, महिलांमधील जागृती, त्याचं आंदोलन असा प्रवास करीत चित्रपट शेवटाकडं येतो. 
चित्रपटासाठी हा ज्वलंत विषय निवडल्याबद्दल दिग्दर्शक श्री नारायणसिंग आणि निर्मात्यांचं अभिनंदन करायला हवं. ज्या भागात अद्यापही उघड्यावर संडासला जाणं बंद झालेलं नाही, त्या भागातील नागरिकांना व विशेषतः महिलांना या प्रश्‍नाची तीव्रता खऱ्या अर्थानं समजू शकंल. इतरांसाठी ‘सोच बदलण्याचं’ हे आव्हान देशासाठी आवश्‍यक असल्याचं नक्कीच लक्षात येईल. चित्रपटाची सुरवात या समस्येबद्दलचे काही प्रसंग दाखवून होत असली, तरी केशव व जयाचं प्रेम प्रकरण सुरू झाल्यावर त्याचा ओझरताही उल्लेख येत नाही. केशवच्या घरात टॉयलेट नसल्याची गोष्ट सुशिक्षित जयाच्या लक्षात येत नाही, हे फारसं पटत नाही. केशवच्या वडिलांचा कर्मठपणाही काही वेळा अधिकच कंठाळी झाला आहे. विषयाची तीव्रता प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मेलोड्रामाचा प्रयोग दिग्दर्शकानं केलेला दिसतो. देशातील निम्म्या जनतेला उघड्यावर टॉयलेटला जावं लागण्यास नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनही जबाबदार असल्याची योग्य दखल चित्रपटात घेतली गेली आहे. (हे करताना दिग्दर्शकाची भूमिका एवढी प्रचारकी असण्याची गरज नव्हती.) मनोरंजन आणि सामाजिक विषय याची योग्य सांगड घालण्यात कथा यशस्वी होते. ‘हस मत पगली’, ‘गोरी तू लठमार’ ही गाणी लक्षात राहतात.  
अक्षयकुमारनं ही थोडी वेगळी भूमिका नेहमीच्या सहजतेनं साकारली आहे.

पहिल्या भागात त्याच्या वाट्याला आलेल्या विनोदी प्रसंगांत तो हसे वसूल करतो, तर दुसऱ्या भागातील गंभीर भूमिकाही त्यानं तेवढीच मन लावून केली आहे. भूमी पेडणेकरनंही छान काम केलं आहे. सुशिक्षित, ताठ मानेनं जगणाऱ्या युवतीच्या भूमिकेत ती छाप पाडते. ‘दम लगाके हैशा’नंतर तिच्या वाट्याला आणखी एक आव्हानात्मक भूमिका आली आहे आणि ती तिनं जोरकसपणे साकारली आहे. अक्षयच्या भावाच्या भूमिकेत द्विवेंदू शर्मा भाव खाऊन जातो. सुधीर पांडे, अनुपम खेर आपापल्या भूमिकांना न्याय देतात.
एकंदरीतच, बुरसट विचारांवरचा जोरदार ‘फ्लश’ असणारा, विचार पद्धतीत बदल आणू पाहणारा हा प्रयत्न खूप मनोरंजक नसला, तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे.

निर्मिती - अरुणा व शीतल भाटिया
दिग्दर्शन - श्री नारायणसिंग 
भूमिका - अक्षयकुमार, 
भूमी पेडणेकर, द्विवेंदू शर्मा.

Web Title: manoranjan news toilet movie