
प्रदर्शनाआधीच झाली घोषणा.. 'धर्मवीर' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच..
DHARMVEER : गेल्या काही दिवसात चर्चेत असलेल्या धर्मवीर या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. धर्मवीर आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसादचा हा लुक रिव्हिल झाला असून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत. पाठोपाठ या चित्रपटाची गाणीही रिलीज झाली असून लाखो चाहते त्या गाण्यांमध्ये हरवून गेले आहेत. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी आतापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशातच अजून एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना मिळाली आहे. या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याचे अभिनेता प्रसाद ओकने एका मुलाखतीत सांगितले.
एका वृत्त वाहिनीने धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि अभिनेता प्रसाद ओक यांची मुलाखत घेतली होती. यावेळी आनंद दिघे यांच्याविषयी प्रसाद भरभरून बोलत होता. प्रसादच्या आयुष्यातील २७ वर्षांच्या प्रवासातील हा पहिला टायटल रोल आहे. तोही आनंद दिघे साहेबांचा रोल मिळाल्याने प्रसादला अत्यंत आनंद झाला आहे. यावेळी दिघे साहेबांमधील कोणते गुण आहेत जे तुला प्रकर्षाने भावले असा प्रश्न प्रसादला विचारला गेला. त्यावेळी प्रसाद म्हणाला. 'दिघे साहेबांमध्ये कोणते कोणते गुण होते, हे दाखवण्यासाठी या चित्रपटाचा हा एक भाग अपुरा आहे. त्यामुळे हा चित्रपट अजून आला पण नाही, तोवर आमच्या मनात याच्या दुसऱ्या भागाची तयारी देखील सुरू झाली आहे.'
पुढे तो म्हणाला, 'त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांची एक स्वतःची कार्यशैली होती. कोणाला किती गरज आहे, त्यानुसार त्या माणसाचे काम तातडीने मार्गी लावले जात होते.' यावेळी त्याने चित्रपटाचे संवाद देखील बोलून दाखवला. यातच चित्रपटाची एक संवाद घेत तो म्हणाला, 'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही.' प्रसादच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'धर्मवीर' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नेमकं काय असेल, कोणत्या प्रसंगावर तो आधारलेला असेल याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे.