esakal | 'हक्काचा पैसा भीक मागितल्यासारखा...'; शर्मिष्ठा राऊतचा मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

sharmishtha raut

इंडस्ट्रीतील इतर कलाकारांना याविरोधात आवाज उठवण्याची केली विनंती

'हक्काचा पैसा भीक मागितल्यासारखा...'; शर्मिष्ठा राऊतचा मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी'ची माजी स्पर्धक व मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने प्रसिद्ध निर्माते मंदार देवस्थळी यांच्याविरोधात पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. शर्मिष्ठाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित नेमकं काय घडलं, ते समजावून सांगितलं. याचसोबत तिने इंडस्ट्रीतील इतर कलाकारांना याविरोधात आवाज उठवण्याची विनंती केली आहे. 

काय आहे शर्मिष्ठाची पोस्ट?
'आम्ही कलाकार चॅनल कोणतंही असो निर्माता कोणीही असो आम्ही नेहमीच आपल्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करूनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे? अनेक वेळा असं होतं की आपण खूप प्रामाणिकपणे आपलं काम (शूटिंग) करतो. आपलं प्रोजेक्ट हे आपलं बाळ आहे आणि प्रॉडक्शन हाऊस हे आपलं घर असं समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रॉडक्शन हाऊसकडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, प्रॉडक्शन हाऊसच्या भोंगळ कारभाराशी तडजोड करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात. चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत. अनेक कारणं वारंवार मिळत असतात.'

'आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला या तत्वांतर्गत काम करत असतो. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येवून पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळणं हे योग्य आहे का? कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना, तंत्रज्ञानांना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली. परंतु आमच्या निर्मात्याने कोणालाही पैसे दिले नाही. निर्मात्याच्या अडीअडचणींच्या वेळेस, एपिसोड्सची बँक नाही म्हणून कधी कधी निर्मात्यांकडे कॉस्च्युम्स नाही म्हणून घरून आपले कॉस्च्युम्स आणून शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चूक आहे का? आपल्या मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भीक मागितल्यासारखा सतत मागत राहणे हे योग्य आहे का', असा सवाल शर्मिष्ठाने केला. 

हेही वाचा : 'एक जमाना था जब हम भी..'; लहान भावाच्या जन्मानंतर तैमुरवरून भन्नाट मीम्स व्हायरल 

गेली १३ वर्षे कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाही. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, मंदार देवस्थळी.. त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतं. घाबरू नका, बोला, असं लिहित शर्मिष्ठाने ही पोस्ट केली. 

हेही वाचा : 'अब किसी की खैर नही'; ६५ वर्षीय अनुपम खेर यांची  फिट बॉडी पाहून चाहते अवाक्!

मंदार देवस्थळी यांनी अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे. 'आभाळमाया', 'वादळवाट', 'अवघाची संसार', 'होणार सून मी या घरची', 'फुलपाखरू', 'हे मन बावरे' यांसारख्या मालिकांचा त्यात समावेश आहे. शर्मिष्ठाच्या आरोपांवर मंदार देवस्थळी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.