सोम ते शुक्र नाटकांवरचा पडदा पडलेलाच; व्यवसायाची समीकरणे बदलणार!

सौमित्र पोटे
गुरुवार, 8 जून 2017

मराठी माणसावर नाटकांचे संस्कार आहेत असे आपण म्हणतो. म्हणूनच अस्सल कलाप्रेमी रसिकाला काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर यांपासून अगदी प्रशांत दामले, भरत जाधव असे नाट्यकलावंत करत असलेल्या नाटकाची पुरेपूर माहीती असते. नव्या नाटकांवर त्यांचा डोळा असतो. नाटक पाहायला जाणे हा सोहळा ठरतो तो त्यामुळेच. पण आता मात्र या नाटकांना एक चाकोरी लाभली आहे. ही नाटके अलिकडे केवळ शनिवार व रविवार या दोनच दिवशी होत असल्यामुळे इतर दिवशी नाट्यगृहे ओस पडू लागली आहेत.

पुणे : मराठी माणसावर नाटकांचे संस्कार आहेत असे आपण म्हणतो. म्हणूनच अस्सल कलाप्रेमी रसिकाला काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर यांपासून अगदी प्रशांत दामले, भरत जाधव असे नाट्यकलावंत करत असलेल्या नाटकाची पुरेपूर माहीती असते. नव्या नाटकांवर त्यांचा डोळा असतो. नाटक पाहायला जाणे हा सोहळा ठरतो तो त्यामुळेच. पण आता मात्र या नाटकांना एक चाकोरी लाभली आहे. ही नाटके अलिकडे केवळ शनिवार व रविवार या दोनच दिवशी होत असल्यामुळे इतर दिवशी नाट्यगृहे ओस पडू लागली आहेत.

मुंबईत नाटके चालतात ती मुख्यत्वे चार नाट्यगृहांत. यात दादरचे शिवाजी मंदिर, विले पार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह, बोरीवलीचे प्रबोधनकार ठाकरे आणि ठाण्याचे गडकरी रंगायतन यांचा समावेश होतो. या चारही ठिकाणी अलिकडे सोमवार ते शुक्रवार एखादा अपवाद वगळता नाटके होत नाहीेत. अलिकडे नाटकांत व्यग्र असलेले अनेक कलाकार सिनेमा, मालिकांतही काम करत असल्याने ही मंडळी इतर दिवशी आपले शूटिंग आणि इतर कामे आटोपत असतात. आणि सुट्टीचे दोन दिवस नाटकाला दिले जातात. ज्येष्ठ व्यवस्थापक गोट्या सावंत यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. याबाबत बोलताना ते म्हणाले, 'सध्या मी चार नाटकांचे व्यवस्थापन पाहातो. यात 'व्यक्ती आणि वल्ली', 'शांतेचं कार्ट चालू आहे', 'क्वीन मेकर' आणि 'यू टर्न 2' यांचा समावेश होतो. ही सगळी नाटके शनिवार आणि रविवारीच होतात. आताशा इतरवेळी नाटकाचे प्रयोग होत नाहीत.'

मुंबईसह पुण्यातही फार वेगळी स्थिती नाही. 'पण पुण्यात तुलनेने नाटके होतात. शुक्रवार ते रविवार असे प्रयोग लावले जातात. विषेशत: 'साखर खाल्लेेला माणूस'', 'कोडमंत्र' अशी नाटके इतर दिवशीही होतात. हा अपवाद वगळता पुण्यातही फार प्रयोग होत नाहीत,' असे पुण्यातील नाट्यसमन्वयक समीर हंपी यांनी सांगितले. नाटकाचा व्यवसाय आता केवळ दोन दिवसांवर आल्यामुळे या व्यवसायाचे नवे गणित उभे करावे लागणार असल्याचे या वर्तुळात बोलले जाते.

Web Title: Marathi drama news esakal