मराठी सिनेमा भला 

शब्दांकन : तेजल गावडे
सोमवार, 27 मार्च 2017

सिनेमॅटोग्राफर गिरीधरन स्वामी व अभिनेत्री प्रियांका चोप्रा व पर्पल पेबल पिक्‍चर्सची निर्मिती असलेला दुसरा मराठी चित्रपट "काय रे रास्कला'मधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी गिरीधरन यांनी मराठी चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिलेले आहे. "काय रे रास्कला' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत... 

सिनेमॅटोग्राफर गिरीधरन स्वामी व अभिनेत्री प्रियांका चोप्रा व पर्पल पेबल पिक्‍चर्सची निर्मिती असलेला दुसरा मराठी चित्रपट "काय रे रास्कला'मधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी गिरीधरन यांनी मराठी चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिलेले आहे. "काय रे रास्कला' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत... 

बराच काळ मुंबईत राहिल्यामुळे मी महाराष्ट्रातीलच आहे. मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलेलं असलं, तरी मला पहिल्यापासून मराठी संस्कृती व चित्रपटसृष्टीचं आकर्षण आहे. मी "गोजिरी', "मी आणि यू', "वेल डन भाल्या' व "धिंगाणा' चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. मला मराठी सिनेसृष्टीसाठी आणखी योगदान द्यायचं असल्याचं गिरीधरन स्वामी यांनी सांगितलं. अभिनेत्री प्रियांका चोप्राची दुसरी निर्मिती असलेल्या "काय रे रास्कला' चित्रपटातून त्यांना दिग्दर्शनाची संधी मिळाली. याबाबत ते म्हणाले की, "धिंगाणा' या मराठी चित्रपटाचं काम करत असताना तिथे पर्पल पेबल पिक्‍चर्सच्या असोसिएट प्रॉड्युसर व अभिनेत्री कुनिका सदानंद एका भूमिकेच्या चित्रीकरणासाठी आल्या होत्या. त्या वेळी आमची ओळख झाली. बोलता - बोलता त्यांनी पर्पल पेबल पिक्‍चर्सचा चित्रपट कराल का, असं विचारलं. त्यानंतर निर्मात्या मधु चोप्रा यांच्यासोबत मीटिंग झाली. त्यानंतर मला दिग्दर्शनाची ही संधी मिळाली. मी कधी विचारदेखील केला नव्हता, की मला पर्पल पेबल पिक्‍चर्ससोबत काम करण्याची संधी मिळेल. 
प्रियांका चोप्रा यांना मी आतापर्यंत दोन-तीन वेळा भेटलो. डॉ. मधु चोप्रा, प्रियांका चोप्रा व कुनिका सदानंद यांनी मला मराठी येतं की नाही, याचा अजिबात विचार न करता माझ्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. तसंच मला कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. माझ्यावर त्यांनी दाखवलेला हा विश्‍वास मला सार्थ करून दाखवायचा आहे, असं ते बोलत होते. 
"काय रे रास्कला' चित्रपटाचं नाव ऐकताच साऊथचा टच असेल असं वाटतं, याबाबत सांगताना गिरीधरन म्हणाले की, या चित्रपटात साऊथचा तडका तर आहेच. हा प्रासंगिक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र महत्त्वपूर्ण आहे. यात एक आयटम सॉंग आहे. तसेच नेहमीपेक्षा वेगळी गाणी पाहायला मिळतील. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा आस्वाद कुटुंबीयांसमवेत लुटता येणार आहे. 
चित्रपटातील कलाकारांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. मराठी कलाकार खूप मेहनती आहेत. त्यात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता गौरव घाटणेकर उत्तम कलाकार आहे. चित्रीकरणावेळी तो भूमिकेत समरस होऊन जायचा की त्याला त्या भूमिकेतून बाहेर पडायला थोडा कालावधी लागायचा. अभिनेत्री भाग्यश्री मोटेदेखील चांगली अभिनेत्री आहे. तसेच आमची प्रॉडक्‍शन टीम व सहायक निर्मातेदेखील महाराष्ट्रीयन होते. हे सगळे खूप मेहनती आहेत, असे ते सांगत होते. 
"काय रे रास्कला' चित्रपटाची पटकथादेखील गिरीधरन स्वामी यांनी लिहिली आहे. याबाबत ते म्हणाले की माझी पत्नी हेमा गिरीधरन मराठी शिक्षिका आहे. तिने आणि प्रोफेसर शिंदे यांनी मला पटकथेच्या अनुवादासाठी खूप मदत केली. मी ज्या भाषेसाठी काम करतो आहे, त्याला योग्य न्याय द्यायला पाहिजे, म्हणून कुठेही चूक होणार नाही, याची काळजी घेतली. यासाठी मी माझी पत्नी हेमा व शिंदे यांचा खूप आभारी आहे. 
दिग्दर्शनाचा अनुभव खूपच अप्रतिम होता. मला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माणसाने कायम नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. तरच त्याची प्रगती होईल, असं मला वाटतं. कलाकार, सहायकांकडून व वरिष्ठांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. मराठी चित्रपट दिग्दर्शन करण्याचं माझं स्वप्न होतं आणि ते "काय रे रास्कला'मुळे शक्‍य झालं. मराठी चित्रपटसृष्टीत मिळालेली प्रत्येक संधी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दिग्दर्शनाचा अनुभव अविस्मरणीय होता. 
"काय रे रास्कला' चित्रपटात कोणताही सामाजिक संदेश देण्यात आलेला नाही. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर एक संदेश तर नक्कीच मिळेल, तो म्हणजे "हसाल तर निरोगी रहाल'. प्रियांका चोप्रा यांचा पहिला मराठी चित्रपट "व्हेटिंलेटर'ला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तशीच भरभरून दाद प्रेक्षक "काय रे रास्कला' सिनेमालाही देतील, अशी आशा या वेळी त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Marathi movie best