मराठी (चित्रपटांचे) पाऊल अडते इथे...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

काही वर्षांत मराठी चित्रपटांची निर्मितिसंख्या वाढली आणि त्याचबरोबर निर्मितिमूल्यातही वाढ झाली. गेल्या पाच वर्षांवर नजर टाकल्यास दिसते की, मराठीत दर्जेदार आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती होतेय. राष्ट्रीय स्तरावरच नव्हे; तर मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा झेप घेतल्याचे दिसते. दिग्दर्शकांची कल्पक फळी तयार झाली आहे. कलाकारांचीही नवीन पिढी पडद्यावर आली आहे. एकूणच काय, मराठी चित्रपट वाढतो आणि बहरतो आहे. तांत्रिकदृष्ट्याही ते उत्तम असतात; शिवाय त्यांचे विषयही विविधांगी असतात. वर्षाला दीडेकशे चित्रपटांच्या निर्मितीची घोषणा होते, प्रत्यक्षात शंभर-सव्वाशे चित्रपट पडद्यावर झळकतात.

काही वर्षांत मराठी चित्रपटांची निर्मितिसंख्या वाढली आणि त्याचबरोबर निर्मितिमूल्यातही वाढ झाली. गेल्या पाच वर्षांवर नजर टाकल्यास दिसते की, मराठीत दर्जेदार आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती होतेय. राष्ट्रीय स्तरावरच नव्हे; तर मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा झेप घेतल्याचे दिसते. दिग्दर्शकांची कल्पक फळी तयार झाली आहे. कलाकारांचीही नवीन पिढी पडद्यावर आली आहे. एकूणच काय, मराठी चित्रपट वाढतो आणि बहरतो आहे. तांत्रिकदृष्ट्याही ते उत्तम असतात; शिवाय त्यांचे विषयही विविधांगी असतात. वर्षाला दीडेकशे चित्रपटांच्या निर्मितीची घोषणा होते, प्रत्यक्षात शंभर-सव्वाशे चित्रपट पडद्यावर झळकतात. "श्‍यामची आई', "श्‍वास' आणि त्यानंतर 2011 मध्ये आलेल्या "देऊळ' या चित्रपटाने सुवर्णकमळ पटकावले आणि केवळ मराठीच नव्हे; अन्य भाषिकांचे लक्ष मराठी इंडस्ट्रीकडे वेधले गेले. 

कोट्यवधींची कमाई 
मराठी चित्रपटांची टेरीटरी, म्हणजेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असल्याची अडचण खूप काळ सांगितली जात होती. मराठी चित्रपटांचा गल्ला, कोट्यवधींचा पल्ला अपवादानेच गाठत होता. पण "काकस्पर्श', "बालक पालक', "दुनियादारी' अशा चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली. रितेश देशमुखचा "लय भारी' आला नि गणितेच बदलली. रितेशने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 2014 मध्ये आलेला हा सिनेमा "लय भारी' ठरला; कारण तो मराठीतील सर्वोत्तम उत्पन्न मिळवणाराही चित्रपट ठरला होता. निशिकांत कामतचे नेटके आणि देखणे दिग्दर्शन, त्याला लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ यामुळे या चित्रपटाने 40 कोटींहून अधिक व्यवसाय केला. "एलिझाबेथ एकादशी', "किल्ला', "यलो', "पोश्‍टर बॉईज', "कट्यार काळजात घुसली', "डॉ. प्रकाश बाबा आमटे', "मुंबई- पुणे- मुंबई-2', "दगडी चाळ', "डबल सीट', "नटसम्राट', "पोश्‍टर गर्ल' अशा चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असली, तरी नागराज मंजुळेच्या "सैराट'ला मिळालेले यश दणदणीतच होते. त्याची कमाई ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक ठरली. त्याला केवळ मराठी प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले असे नाही; तर बिगरमराठी प्रेक्षकांनाही चांगले स्वागत केले. आजही या चित्रपटाचा आणि गाण्याचा झिंगाट "हॅंग ओव्हर' उतरलेला नाही. 

पुरस्कार आणि चित्रपट महोत्सव 
महाराष्ट्र किंवा भारतातच नाही; तर परदेशातील मानाच्या "कान्स', "व्हेनिस', "बर्लिन', "टोरांटो' महोत्सवात मराठी चित्रपटांनी हजेरी लावली. तेथील समीक्षक आणि प्रेक्षकांनीही त्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पाच ते सहा पुरस्कार मराठी चित्रपटांनी पटकावले आणि तेथेही वर्चस्व दाखवले. अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना मराठीने कमालीची टक्कर दिली आणि थेट ऑस्करपर्यंत धडक मारली. "कोर्ट' हा मराठी चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आला. 

आता असे करूया... 
मार्केटिंग आणि प्रमोशन्समध्ये मराठी चित्रपटसृष्टीत उदासीनता दिसते. मार्केटिंगसाठी नव्या तंत्राचा अवलंब केला जात नाही. निर्मात्यांमधला समन्वयही वाढायला हवा. नाहीतर होते असे, की एखाद्या शुक्रवारी पाच-पाच मराठी चित्रपट एकमेकांच्या स्पर्धेत उभे ठाकतात; तर कधी लागोपाठचे शुक्रवार मोकळे जातात. दर्जा अधिक वाढण्यासाठी नव-नव्या टेरीटरी शोधायला हव्यात. मराठी चित्रपटांना थिएटर-मल्टिप्लेक्‍समध्ये प्राइम टाइम मिळण्याचा सनातन संघर्षावर कायमस्वरूपी मार्ग गरजेचा आहे. मराठी चित्रपटांचे पाऊल अडवणाऱ्या या त्रुटी दूर झाल्या तर येणारा काळ उज्ज्वलच आहे. 

पुन्हा लाईट-कॅमेरा-ऍक्‍शन 
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध लोकेशन्स मराठी चित्रपटांसह हॉलिवूडलाही भुरळ घालत आहेत. "रिमेंबर अमनेशिया' या हॉलिवूडपटाचे चित्रीकरण नुकतेच जिल्ह्यात पूर्ण झाले. शेती आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला कोल्हापूर जिल्हा चित्रीकरणासाठी वरच्या क्रमांकाचा ठरतो आहे. मुंबईपेक्षा येथील निर्मितिखर्च कमी असणे, हा महत्त्वाचा मुद्दाही यामागे असला तरी त्यातून येथील पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञांना रोजगार मिळतोय. कोल्हापूर चित्रनगरीचा वनवासही आता संपला आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कामानंतर येथे चित्रीकरण सुरू होईल. शिवाय, नाशिक, सातारा जिल्ह्यातही काही चित्रपटांचे चित्रीकरण होत आहे. 

मराठी प्रेक्षकच मुळात प्रगतशील आहे. त्यामुळे वेगळं काहीतरी करायची हिंमत येते. चांगला चित्रपट चालतोच त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. मराठी चित्रपटाने हे सिद्ध केले आहे. 

स्वप्ना जोशी - वाघमारे (दिग्दर्शिका) 

क्रिएटिव्हदृष्ट्या पाहिलं तर बरेच बदल घडले. मराठी चित्रपट चौकटीतून बाहेर पडला. ग्रामीण विषय हाताळणारा मराठी चित्रपट शहरी विषयांकडे वळू लागला. काही ग्रामीण विषयही नवीन पद्धतीने हाताळले गेले. तांत्रिकदृष्ट्या म्हणजे संकलन, छायाचित्रण, ध्वनिलेखन या विभागांत मराठी चित्रपटाने प्रचंड झेप घेतली. हिंदीच्या तोडीस तोड चित्रपट येऊ लागले. हिंदी सिनेसृष्टीने मराठी चित्रपटाला कंटेंट ड्रिवन अशी उपाधी देऊन पाठ थोपटली; मराठी अस्मितेकडे मराठी चित्रपटाला जागतिक पातळीवर नेण्याची क्षमता आहे, यात वाद नाही. 
अमोल शेटगे (दिग्दर्शक)

"आता मराठीच नाही तर बिगरमराठी प्रेक्षकांनाही मराठीची महती समजली आहे. आता अधिकाधिक चांगले चित्रपट बनवणे आवश्‍यक आहे.' 
- समृद्धी पोरे 
(निर्मात्या व दिग्दर्शिका) 

-- 
गेल्या पाच वर्षांत मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाले. एका निर्मात्याने निर्मिती करण्यापेक्षा चार-पाच जणांनी एकत्रितरीत्या निर्मिती केल्यास चित्रपटांच्या अर्थकारणासाठी ते फायद्याचं ठरेल. भविष्यासाठी "वेबरिलीज' या कन्सेप्टचा निर्मात्यांनी विचार करावा. 
- मेघराज भोसले 
(अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष) 
 

Web Title: marathi movie industry problems