'डॉ. तात्या लहाने' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi News Article_Dr. Tatya Lahane_New Movie_Lunch Program
Marathi News Article_Dr. Tatya Lahane_New Movie_Lunch Program

विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित 'डॉ. तात्या लहाने - अंगार...पावर इज विदीन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कथा मातृत्वाची, कथा त्यागाची, कथा संघर्षाची, कथा जिद्धीची असलेला हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मातृत्व व जिद्द आणि स्वामी विवेकानंद यांचा त्याग व संघर्ष या गुणांना अभिवादन करण्याच्या हेतूने या दोन्ही महामानवांच्या जयंती दिनी म्हणजेच १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे', असे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मार्ते विराग मधुमालती वानखेडे यांनी सांगितले.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मार्ते विराग वानखेडे यांनी र.फा. नाईक कॉलेजच्या भव्य प्रांगणात आयोजित सोहळ्यात 'डॉ. तात्या लहाने - अंगार...पावर इज विदीन' प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. या सोहळ्यात गणेश नाईक (माजी पालक मंत्री, ठाणे जिल्हा), जयवंत सुतार (महापौर नवी मुंबई), आमदार संदिप नाईक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मार्ते विराग वानखेडे यांनी चित्रपट समाजाला नवीन दिशा देणारा ठरेल. विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. 

हा चित्रपट डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारलेला आहे. त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी दान करून समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेश यातून दिला आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथ अशा एकुणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांची ही 'बायोपिक' आजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. 

विराग यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन ते अडीच तासामध्ये अतिशय उत्तमरित्या गुंफला आहे. 'रिले सिंगिंग' या उपक्रमाने या सिनेमाचं वेगळेपण अधिक वाढलं आहे. विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३२७ गायकांनी सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने गायिले आहे.  या चित्रपटाने 'रिले सिंगिंग'च्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला. 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू...' हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायले आहे. केतकी माटेगावकरनेही या सिनेमात एका गाण्यासाठी आवाज दिला आहे. या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजनाबाईंच्या भूमिकेत आहेत. यांच्यासोबत सिनेमात रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com