लग्नाची गोष्ट : ‘शब्दांपलीकडची’ संसारगाथा! | Marrigae Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाची गोष्ट : ‘शब्दांपलीकडची’ संसारगाथा!
लग्नाची गोष्ट : ‘शब्दांपलीकडची’ संसारगाथा!

लग्नाची गोष्ट : ‘शब्दांपलीकडची’ संसारगाथा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- अनिरुद्ध व रसिका जोशी

मनोरंजन सृष्टीत व्हर्सेटाईल गायक म्हणून गायक अनिरुद्ध जोशी याचे नाव घेतले जाते. विविध शैलींतील, भाषांमधील गाणी गात त्यानं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याच्या पत्नीचं नाव रसिका. अनिरुद्ध आणि रसिका यांची गेल्या १६-१७ वर्षांपासूनची मैत्री आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक गाण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे, तसेच गाण्याचे अनेक कार्यक्रम त्यांनी एकत्र केले आहेत. ते २०१२मध्ये विवाहबद्ध झाले.

अनिरुद्धनं सांगितलं, ‘माझ्या संगीताच्या संपूर्ण प्रवासाची रसिका साक्षीदार आहे. वेळोवेळी माझा भक्कम आधार ठरली आहे. ती अतिशय समजूतदार आहे. तिचा स्वभाव बोलका आणि मनमिळाऊ आहे. सगळ्यांना ती सांभाळून घेते. फक्त स्वतःचा विचार न करता सगळ्यांना सोबत घेऊन ती पुढं जाते. प्रत्येकांबद्दल तिच्या मनात एक आदर आणि प्रेम असतं. त्यामानानं मी थोडासा अबोल, आपल्या आपल्यातच राहणारा होतो. तिच्या सहवासात राहून मीही सगळ्यांमध्ये मिसळू लागलो आहे. आयुष्याची मजा सर्वांना सोबत घेऊन चालण्यात आहे. त्यानं समोरच्या माणसाला आणि आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते, हे मी तिच्याकडून शिकत आलो आहे. तीही उत्कृष्ट गाते.

कोणत्याही कलाकाराचा स्वभाव हा त्याच्या कलेतून दिसून येतो; तसाच रसिकाचा इनोसन्स तिच्या गाण्यातून दिसतो. ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’ हे आशा भोसले यांनी गायलेलं गाणं रसिका खूप छान गाते. ती जितकी चांगली बायको आहे, त्याहून चांगली ती एक आई आहे. आमची मुलगी अवनीचं रसिकावर खूप प्रेम आहे. अवनीला काय हवं नको ते बघणं, ती लवकरच एका ‘रिॲलिटी शो’मध्ये दिसणार असल्यानं तिची शाळा, शूटिंग, अभ्यास हे सगळं ती खूप छान सांभाळते. हे सगळं करत असताना स्वतःच्या आवडीनिवडीही उत्तमप्रकारे जोपसाते, हे विशेष.’’

रसिका अनिरुद्धबद्दल बोलताना म्हणाली, ‘अनिरुद्ध हा माझा नवरा कमी आणि मित्रच जास्त आहे. माझी आणि अनिरुद्धची खूप जुनी मैत्री असल्यानं मी त्याला पूर्णपणे ओळखते. त्याला काय आवडतं, काय नाही, एखाद्या गोष्टीवर तो कसा रिअॅक्ट करेल हे मला नीट माहीत असतं. तो अत्यंत समजूतदार आहे, शांत आहे, प्रेमळ आहे. फक्त जवळच्या माणसांनाच नाही, तर तो प्रत्येकाला तितकाच जीव लावतो. प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करून तो निर्णय घेतो. मला त्याच्यातली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी त्यानं काही चांगलं केलं, तरी तो ते कधीही बोलून दाखवत नाही. अगदी निरपेक्ष भावनेनं तो सगळ्या गोष्टी करतो. माझ्या कामात मला बऱ्याचदा त्याची मदत होते. कधी माझी कामं तो करतो, त्याची कामं मी करते. अशाप्रकारे आम्ही दोघंही आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतो. त्याचा स्वभाव शांत आणि प्रेमळ असल्यानं अनेक गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात. तो खूप चांगला पिताही आहे. अवनीची आणि अनिरुद्धची एक टीम आहे! त्यांच्यात खूप स्ट्रॉंग बॉण्डिंग आहे. तिनं काहीतरी नवीन करावं यासाठी तो तिला कायम प्रोत्साहन देत असतो. कामाच्या बाबतीत तो अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहे. तो खूप मन लावून त्याचं काम करतो, कामाला प्राधान्य देतो. विविध कार्यक्रमांतून मोठमोठ्या गायकांची तो गाणी गात असतो. त्यात तो गात असलेली ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘आज अचानक’ ही गाणी मला विशेष आवडतात.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image
go to top