लग्नाची गोष्ट : ‘भेळ’ अल्लड आणि शांत स्वभावांची!

स्वप्नील आणि मृण्मयी यांचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. मृण्मयी अल्लड, तर स्वप्नील शांत. स्वप्नील म्हणाला, ‘मृण्मयी बेस्ट जोडीदार आहे.
Mrunmayee Deshpande and Swapnil Rao
Mrunmayee Deshpande and Swapnil RaoSakal

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव. चाहते या दोघांवर भरभरून प्रेम करतात. मराठीतील एक बहुगुणी, संपन्न अभिनेत्री अशी मृण्मयीची ओळख आहे, तर स्वप्नील हा फार्माकल्चर कन्सल्टंट आहे. त्यांची स्वतःची शेती आहेच, त्याव्यतिरिक्त स्वप्नील लोकांना जंगलनिर्मिती करण्यासाठी मदत करतो. मृण्मयी आणि स्वप्नील या दोघांचं अॅरेंज मॅरेज आहे आणि लग्नासाठी जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी मृण्मयी एक अभिनेत्री आहे, इतकीच माहिती स्वप्नीलला होती. तोपर्यंत तिचं काम त्यानं पाहिलं नव्हतं. पहिल्या भेटीत दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले, विचार पटले. स्वप्नीलला मृण्मयीचा मनमोकळेपणा, बिनधास्त स्वभाव आवडला, तर मृण्मयीला स्वप्नीलचा समजूतदारपणा भावला. त्यावेळीच त्यांना जाणवलं, की आपणच एकमेकांसाठी परफेक्ट आहोत आणि त्यांनी एकमेकांना होकार दिला. यावर्षाखेरीस या त्यांच्या लग्नाला पाच वर्षं होतील.

स्वप्नील आणि मृण्मयी यांचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. मृण्मयी अल्लड, तर स्वप्नील शांत. स्वप्नील म्हणाला, ‘‘मृण्मयी बेस्ट जोडीदार आहे. ती खूप चांगली मैत्रीण आहे. ती अतिशय अवखळ, बिनधास्त आणि मजा घेत आयुष्य जगते. छोट्या-छोट्या गोष्टी एन्जॉय करायच्या, प्रत्येक गोष्टीत आनंद मानायचा आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता स्वछंदीपणे आयुष्य कसं जगायचं तिचा स्वभाव मला खूप आवडतो. ती खूप मनमिळाऊ आणि गप्पिष्ट आहे. अनेकवेळा स्वतः पुढाकार घेऊन ती घरी नातेवाइकांना बोलावून आम्हा सगळ्यांचं गेट टुगेदर ॲरेंज करते आणि तिच्यामुळं आम्हीही सगळे नातेवाईक एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत. ती आमच्या कुटुंबात खूप छान मिसळली आहे, तिनं प्रत्येकाशी स्वतःचं खास नातं तयार केलं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असल्यानं बऱ्याचदा आम्ही न बोलताच आमच्या मनातलं तिला कळतं. मृण्मयीनं मला नेहमीच साथ दिली आहे. माझ्या कामात, माझ्या प्रत्येक निर्णयात ती कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. इतकंच नव्हे, तर माझ्याबरोबर शेतात येऊन ती विविध रोपांची लागवडही आवडीनं करते. आम्ही हे खूप एन्जॉय करतो.’’ मृण्मयीचे सगळेच चित्रपट स्वप्नीलनं पाहिले आहेत. पण ‘एकापेक्षा एक’ या कार्यक्रमातील मृण्मयीची सादरीकरण, ‘मोकळा श्वास’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांत मृण्मयीनं साकारलेल्या भूमिका स्वप्नीलला विशेष आवडल्या.

मृण्मयीनं स्वप्नीलबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘स्वप्नीलचा माझ्याविरुद्ध असलेला स्वभाव हीच गोष्ट मला भावली. ज्या गोष्टी माझ्या स्वभावात नाहीत त्या सगळ्या स्वप्नीलमध्ये आहेत. मुळात तो अत्यंत हुशार, अतिशय शांत, समंजस, समजूतदार, मितभाषी आहे. अशी एकही गोष्ट नाही जी त्यानं सांगितलेली नाही किंवा माझ्याबद्दलची अशी एकही गोष्ट नाही जी त्याला माहीत नाही. कामानिमित्त माझा सतत मुंबई-पुणे प्रवास सुरू असतो, बऱ्याचवेळा मी घरी नसते. पण आम्ही एकमेकांशिवाय फार दिवस लांब राहू शकतच नाही. तीन-चार दिवस झाले, की काहीतरी अॅरेंजमेंट करतो आणि एका घरी राहतो. कामाच्या बाबतीत तो अत्यंत पॅशनेट आहे. माती आणि त्याचं जिव्हाळ्याचं नातं आहे, लोकांसाठी काम करण्याची त्याला आवड आहे. तो त्याचं दोनशे टक्के देऊन काम करतो. तितकाच तो मलाही पावलोपावली पाठिंबा देत आला आहे. माझ्या सगळ्याच कामांत त्याचा सहभाग असतो. अशी आम्ही दोन विरुद्ध गुण असलेली माणसं असल्यामुळं आमच्यात असलेल्या गुणांची, आमच्या वेगवेगळ्या स्वभावांची एकमेकांबरोबर देवाणघेवाण करून आम्ही एकमेकांचं आयुष्य पूर्ण करतो असं मला वाटतं.’’

स्वप्नील आणि मृण्मयी यांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे असले, तरी त्यांच्या आवडीनिवडी या कॉमन आहेत. डोंगर, निसर्ग, भटकंती हे दोघांच्याही जिवाभावाचे विषय आहेत, दोघेही खवैये आहेत. त्यातून भेळ ही दोघांचीही ऑल टाइम फेव्हरेट डिश आहे. अशाप्रकारे विरुद्ध स्वभावाचे हे दोघं खरोखर मेड फॉर इच अदर कपल आहे...

(शब्दांकन - राजसी वैद्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com