
MC Stan: 'काय सांगू तुम्हाला..' अन् बोलता-बोलता बिग बॉस विजेता एम सी स्टॅन झाला भावूक
MC Stan: बिग बॉस 16 चा फिनाले अखेर पार पडला आणि यंदाच्या सिझनला त्याचा विजेता मिळाला. पुण्याच्या झोपडपट्टीतून पुढे येत रॅपर म्हणून नाव कमावलेल्या एम सी स्टॅननं बिग बॉस 16 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
प्रियंका चाहर चौधरी किंवा शिव ठाकरे जिंकण्याची शक्यता वर्तवली असताना एम सी स्टॅननं जिंकलेलं विजेतेपद हा कदाचित अनेकांसाठी अनपेक्षित निकाल राहिला असेल.
'काय सांगू तुम्हाला..' असं म्हणत एका मुलाखतीत एम सी स्टॅननं दिलेली भावूक प्रतिक्रिया नक्कीच आपल्याही मनाला स्पर्शून जाईल.(MC Stan winner bigg boss 16)
रॅपर एमसी स्टॅननं बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. विजेता म्हणून घोषित झाल्यावर एमसी स्टॅननं भावूक प्रतिक्रिया देत आपल्याला पाठिंबा देणाऱ्या अनेकांचे आभार मानले आहेत.
एम सी स्टॅन म्हणाला,'' सुरुवातील बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मला घरातून पळून जावंसं वाटत होतं. मला कळायचंच नाही हे काय होतंय. सकाळी उठल्या उठल्या म्युझिक वाजायचं आणि घरातले लोक नाचायला लागायचे.
मी एकदा शीवला विचारलं हे गरजेच आहे का नाचणं मला उठल्या उठल्या बाथरुमला जायचं असतं..हे काय नाचतायत सगळे,मला या सगळ्याचं आधी टेन्शन आलं होतं. पण जेव्हा शीवनं सांगितलं की नाचलंच पाहिजे असं काही नाही तेव्हा जीव भांड्यात पडला माझा''.
आपण अनेकदा चुकीचे शब्द वापरले की सलमान खान आपल्याला समजवायचा,चांगलं बोल सांगायचा ते मी शक्य होईल तिथे फॉलो केलं. पण काही लोक वागायचेच असे की बोलावं लागायचं असं देखील स्टॅन म्हणाला.
मुलाखतीत बोलता बोलता एम सी मध्येच अस्खलीत मराठीत म्हणाला..''काय सांगू तुम्हाला'' अन् भावूक झालेला दिसला. आपली आई आणि वडीलांचा आनंद शब्दात मांडताना एम सी स्टॅनला भावना अनावर झाल्या. आपल्या विजयासाठी एम सी स्टॅननं आपल्या चाहत्यांचे मनापासून धन्यवाद मानले.