जावडेकरांतर्फे दिल्लीत `मी वसंतराव` स्पेशल स्क्रिनींग; शरद पवार, आठवलेंची उपस्थिती

आता समेवरी हे कैवल्यगान आले; `मी वसंतराव` ला दर्दी दिल्लीकरांची दाद
Me Vasantrao special screening in Delhi by Javadekar
Me Vasantrao special screening in Delhi by Javadekar

नवी दिल्ली - अभिजात शास्त्रीय संगीतातील घराण्याच्या भिंतींचे अडथळे न जुमानता निखळ सुरांची आस आणि कास धरून संगीताचे विश्व गाजवणारे गानतपस्वी वसंतराव देशपांडे यांचे प्रत्यक्ष जीवनही एका अवलियाचेच जीवन होते. माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं, असं पुण्यातल्या संगीत मार्तंडांना ठणकावणाऱया वसंतराव नामक विख्यात गायकाची संघर्षमय जीवनगाथा उलगडणाऱया `मी वसंतराव ` या सध्या गाजणाऱया चित्रपटाचा खास प्रयोग दिल्लीत आयोजित करण्यात आला. निवडक दिल्लीकर दर्दी्नी या चित्रपटातील गीतांना भरभरून दाद दिली. याच चित्रपटासाठी यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारे युवा गायक राहूल देशपांडे आणि एका सामान्य रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेतून चित्रपटाचा, त्यातील गीतांचा मागच्या रांगेत बसून शांतपणे आस्वाद घेणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सपत्नीक उपस्थिती हेही या प्रयोगाचे वैशिष्ट्य ठरले.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व प्राची जावडेकर यांनी हा खास प्रयोग दिल्लीत आयोजित केला होता. महादेव रस्त्यावरील फिल्म डिव्हीजनच्या प्रेक्षागृहात रंगलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले व डाॅ. भागवत कराड, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, धनंजय महाडीक, गोपाळ शेट्टी, राज्यसभेच्या उपसभापती पॅनलच्या सदस्या वंदना चव्हाण, भाजपच्या सागरपार विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले आदी मान्यवरांसह संगीतातील कानसेन दिल्लीकरही आवर्जून उपस्थित होते. मध्यंतरात जावडेकर यांनी राहूल देशपांडे व कलाकारांचा छोटेखानी सत्कार केला.

मास्टर दीनानाथ मंगेशकर व बेगम अख्तर यांच्यापासून लाहोरमधील एका अवलिया फकीरापर्यंत अनेक गुरूंच्या गायनातील सुवर्णकण वेचून शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपली स्वतंत्र शैली विकसित करणाऱया वसंतरावांना त्या काळी किती अपमान, कुचेष्टेच्या प्रसंगांना आणि आर्थिक हलाखीलाही सामोरं जावं लागलं होतं,, याचे अतिशय प्रभावी चित्रण असलेला मी वसंतराव हा चित्रपट. `गाणं हे करियर` करणाऱयांना जुन्या काळात काय काय दिव्यांतून जावं लागत असे याचं जे शोकात्म दर्शन घडवतो त्यावर आजच्या युवा गायकांचा विश्वास बसणार नाही. पण वसंतरावांना संगीतातील प्रस्थापितांकडून किती हेटाळणी सहन करावी लागली होती याची झलक यातून दिसते. पु.ल. देशपांडेंसारख्या अनेकांच्या जिवाभावाच्या मैत्रीची साथ असली तरी संगीत क्षेत्रातील त्या काळच्या घराणेबाज अहंमन्य वातावरणामुळे- त्या गाण्याच्या तळहातावर रूसल्या कौतुकरेषा.....ही वसंतरावांची खंत त्यातूनच जन्माला आली असावी... दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व वसंतरावांचंच गाणं गाणारे राहूल यांचं संगीत ही चित्रपटाची शक्तीस्थळे आहेत.

मास्टर दीनानाथ, बेगम अख्तर यांच्या अनेक गाजलेली नाट्यपदं, गझला, एक बैठकीची लावणी, कट्यार काळजात घुसली मधील गाजलेल्या चीजा अशा तब्बल २२ गीतांची बरसात या चित्रपटात श्रोत्यांवर होत रहाते. उस्ताद राशीद खान यांच्या आवाजातील मारवा रागातील जगप्रसिध्द बंदिशीला आणि आता समेवरी हे कैवल्यगान कैवल्यगान आले, या अखेरच्या गीतालाही टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.

योगायोग पाहा...

पावसाळा हा वेगळा श्रुतूच नसणाऱया राजधानी दि्ल्लीतले निवडक दीडशे दर्दी रसिक सुरांच्या या पावसात चिंब भिजले... आणि रात्री नऊ्या सुमाराला चित्रपट संपवून बाहेर पडतापडताच रसिकांचं स्वागत मात्र दिल्लीस्टाईल पावसाच्या एका हलक्या सरीने केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com