Audience Review: मी वसंतराव - संघर्षाचा सांगीतिक प्रवास Mee Vasantrao | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mee Vasantrao Marathi Movie- Rahul Deshpande As Vasantrao

Audience Review: मी वसंतराव - संघर्षाचा सांगीतिक प्रवास

शास्त्रीय, उपशास्त्रीय गानप्रकार ऐकत आलेल्या आधीच्या पिढ्या किंवा आताची तरुण पिढी यांत 'वसंतराव देशपांडें'(Vasantrao Deshpande) नावाचं वादळ माहीत नसणारी माणसं मिळणं जवळपास अशक्यच ! नाविन्यपूर्ण आणि आक्रमक गायकीच्या विलक्षण प्रांताचे दरवाजे त्यांनी रसिकांकरता खुले केले. वसंतरावांच्या गायकीला लोकमान्यता मिळाली, प्रसिद्धी मिळाली परंतु त्यामागच्या संघर्षाचे अनेक पैलू आजवर अज्ञात होते. 'मी वसंतराव'(Mee vasantrao) या सरस सिनेमाच्या माध्यमातून आता ते पाहता आणि समजून घेता येतील. केवळ तांत्रिकदृष्ट्या न पाहता, रसास्वादाच्या विस्तारित नजरेनं पाहत, कानांनी ऐकून घेत ही कलाकृती समजून घेणे अधिक उचित ठरेल.

हेही वाचा: 'मी वसंतराव'च्या निमित्तानं उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री !

बालवयातच संघर्षाची, अडचणींची नांदी सुरू झालेलं जगणं वसंतरावांच्या वाट्याला आलं. पण धीरोदात्त आणि खमक्या स्वभावाच्या आईनं त्यांना तशी तालीमही दिली. अनिता दातेंनी हे पात्र सुंदर साकारलं आहे. त्यातही सुरुवातीस येणारा वैदर्भीय भाषा आणि उच्चारांचा लहेजा ऐकायला सहजसुंदर वाटतो. मास्टर दिनानाथांचं पात्र हे विस्तारानं आणि वैचारिक मांडणी करत समोर येतं. केवळ गुरू म्हणून एकच बाजू न येता कलावंत म्हणून असणारी मतं, दुःखंही यात गुंफली आहेत व ही बाजू महत्त्वाची वाटते. फारसे संवाद नसले तरीही कौमुदी वालोकरने साकारलेलं वसंतरावांच्या पत्नीचं पात्र, आपली सशक्त पण शांत उपस्थिती नमूद करतं. 'कट्यार'च्या प्रयोगावेळचे तिच्या चेहऱ्यावर येणारे आश्चर्यमिश्रित अभिमानाचे भाव अगदी नैसर्गिक वाटतात. कुमुद मिश्रा, दुर्गा जसराज, सारंग साठ्ये यांनीही आपापल्या छोटेखानी भूमिकांना सुयोग्य न्याय दिलाय. पुष्कराज चिरपुटकरांनी साकारलेली पु.लं.ची भूमिका अगदी भ्रमित (चांगल्या अर्थाने ) करणारी आहे. काही प्रसंगी तरुण वयातले पु.लं.च पडद्यावर वावरत असल्याचा भास आपल्याला होतो आणि खचितच ते श्रेय अभिनयाकरता घेतलेल्या मेहनतीचं आहे. आणि सरतेशेवटी पण ताकदीने उरतात ते 'वसंतराव' म्हणजेच(Rahul Deshpande) राहुल देशपांडे ! त्यांनी अभिनयाचा एक विशिष्ट तोल या सिनेमात राखलाय. सुहृदांच्या सहवासात फुलत जाणारी कला आणि सोबतीस एकाकी पाडत राहणारी Melancholy ( विषाद ) यांच्या मधोमध मार्गक्रमण करणाऱ्या कलावंताला त्यांनी सकसपणे जिवंत केलंय. त्यांच्या दृष्टीत अभिनय तरळत राहिलाय.

हेही वाचा: 'मी वसंतराव'चा Trailer: 'वशा कारकूनी सोडून गायला सुरुवात कर!'

'मी वसंतराव'चा मूळ आत्मा काही असेल तर सोपं उत्तर आहे की ते संगीत आहे. पं. छानूलाल मिश्र म्हणतात तसं उत्तम संगीताला तोलून धरणारं, त्याचं सौंदर्य वाढवणारं काव्यही जोडीस असणं गरजेचं असतं. या चित्रपटात दोन्हीही घटक समतोल आहेत हे नमूद केलं पाहिजे. पु.लं.ची ओळख करून देताना येणारं 'ललना' नावाचं गाणं खट्याळपणे आणि लटका घेत येतं. या गाण्याची ठेवण प्रफुल्लित करणारी आहे. याच्या अगदी उलट,' ऐसे निकली हैं आह दिल से नई जैसे महफिल से उठ के जां जाये '. हे वैभव जोशींचे शब्द सिनेमात बेगम अख्तरांच्या ओठांतून प्रसवतात आणि आपण ठार घायाळ होतो. ती सुरावट आणि चित्रीकरण खासच जमून आलंय. पु.लं.नी पूर्वी एका भाषणात म्हटल्याप्रमाणे ख्याल गायनात जी ऊर्जा लागते त्याच पद्धतीचं रक्त लावणी गाताना आणि ती श्रुंगारपूर्वक मांडताना आटवावं लागतं. 'पुनव रातीचा' ही बैठी लावणी त्या भावनेचा काहीसा प्रत्यय देणारी आहे. संगीतकार व गायक म्हणून राहुल देशपांडेंनी नाट्यगीतं, गझल, भजन, लावणी असे प्रकार यांत हाताळलेत आणि हे वैविध्य त्यांनी प्रतिभेनं मांडलंय. थेटरात गाणं संपल्यावर पडणाऱ्या टाळ्या हे त्याचं एक निदर्शक आहे.

हेही वाचा: 'मी वसंतराव' कान्सच्या महोत्सवात, राहुल देशपांडेंची पोस्ट व्हायरल

मुळात वसंतरावांना आलेले अनेक आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जीवनानुभव त्यांच्यातल्या कलाकाराला कुठल्याही चौकटीत थांबण्यास मज्जाव करत राहिले. जे स्फुरतं, मनःपूर्वक बाहेर येतं त्या संगीताची त्यांनी कास धरली, त्या कलेचा सन्मान केला. संगीत समीक्षक व लेखक डॉ. आशुतोष जावडेकर एका मुलाखतीत म्हणतात, ' कला प्रवाही राहिली नाही तर ती कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.' समाजाला नाविण्याचं भय असतं आणि तोचतोचपणाची सवय झालेली असते पण हे ही खिंडार कलावंतालाच फोडाव लागतं हा इतिहास आहे. वसंतरावांची कला ही एखाद्या निर्झरागत प्रवाही, आक्रमक आणि नावीन्य देणारी होती. शड्डू ठोकत आव्हान देणारी होती जिने प्रवाहाचं एक पातं वाहतं ठेवलं. 'मारवा' राग आणि त्याबाबतचं विवेचन या प्रसंगातून गायकीची जडणघडण जशी दिसते तशी ती अजून काही प्रसंगांतून पाहताना बहार आली असती असंही जाणवत राहतं. सिनेमात येणारे सांकेतिक प्रसंग, त्यांची उत्तम मांडणी दिग्दर्शक म्हणून निपुण धर्माधिकारींनी सशक्तपणे सांभाळली आहे. जीवनात वडिलांच्या अनुपस्थितीत होणारे मानसिक गोंधळ, त्यांचा शोध घेत अखेर उत्तराप्रत पोचणं याची सुरेख मांडणी केलीये. चाळिशीनंतर पूर्णवेळ गायनकलेला झोकून देणारं वसंतरावांचं साहस 'शनैः पन्थाः शनैः कन्था...'ची आठवण करून देतं. संघर्ष आणि संयम अटळ असतात पण त्याला षड्जाची जोड दिली की ते जगणं संगीतमय, सुसह्य होतं. 'मी वसंतराव' हा अशाच एका वादळाच्या संघर्षाचा सांगीतिक प्रवास आहे.  तो आवर्जून पाहण्या आणि अनुभवण्यासारखा आहे.

सौरभ खोत

iamsaurabh09@gmail.com

Web Title: Mee Vasantrao Marathi Movie Audience

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..