#MeToo : दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री आणि पत्रकार महिलेचा आरोप; वाचा पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

साजिद रात्री अपरात्री मला फोन करायचा. माझ्याशी अश्लिल बोलायचा. मी त्याच्या हाताखाली काम करते त्यामुळे मी त्याचं ऐकणं भागच आहे असं तो मला सांगत राहायचा. माझी मुलाखत घेताना त्यानं मला काही अश्लील प्रश्न विचारले होते. - अभिनेत्री सलोनी चोप्रा

'मी टू'च्या वादळात बॉलिवूमधील एकानंतर एक बडी नावे समोर येत आहेत. यात असेच एक बडे नाव म्हणजे दिग्दर्शक साजिद खान. साजिदवर लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप झाला आहे. एका अभिनेत्रीने आणि बॉलिवूड पत्रकार महिलेने साजिदवर हे आरोप फेसबुक आणि ट्विटरद्वारे केले आहेत.

'हे बेबी', 'हाऊसफुल', 'हमशकल' अशा हिट सिनेमांचा दिग्दर्शन केलेल्या साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि बॉलिवूड जर्नलिस्ट करिष्मा यांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. 

सलोनी चोप्रा हिने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, 'सिने इंडस्ट्रीत एकेकाळी मी साजिद खानची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं आहे. साजिद सोबत मी जो काळ व्यतीत केला आणि त्यातून मला जो अनुभव आला तो मानसिकदृष्या खचवणारा होता. साजिद रात्री अपरात्री मला फोन करायचा. माझ्याशी अश्लिल बोलायचा. मी त्याच्या हाताखाली काम करते त्यामुळे मी त्याचं ऐकणं भागच आहे असं तो मला सांगत राहायचा. माझी मुलाखत घेताना त्यानं मला काही अश्लील प्रश्न विचारले होते.

2011 साली मला हे सगळे वाईट अनुभव आले. रात्री फोन करून साजिद कामाव्यतिरिक्त माझ्याशी घाणेरडे संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. मी फोन घेतले नाही की असभ्य भाषेत मला तो ऐकवायचा. मी अनाकर्षक दिसते त्यामुळे या क्षेत्रात मला कोणीही काम देणार नाही असं सांगून दररोज माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. कित्येकदा फोन करून तो माझ्याकडे अश्लिल फोटोंची मागणी करायचा. अभिनेत्री व्हायचं असेल तर बिकीनीमधले फोटो मला पाठव असंही फोन करून मला सांगायचा. त्याच्यासोबत काम करत असताना अनेकदा तो मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करायला लावायचा. माझ्यासाठी सारचं किळसवाणं होतं.

दिवसेंदिवस त्यांच्या वागण्याचा मला खूपच त्रास होत होता. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलही तो माझ्याकडे वाईट बोलायचा. त्याची एक्स गर्लफ्रेंड ही मी आतापर्यंत पाहिलेली या क्षेत्रातली एक उत्तम अभिनेत्री होती. त्याच्या खासगी जीवनातील नको त्या गोष्टीही तो मला सांगायचा. एका अभिनेत्रीला त्यानं माझ्यासमोर स्कर्ट वर करायला लावला होता. त्यानंतर ती खूपच अनाकर्षक दिसते आणि अभिनेत्री होण्याचे कोणतेही गुण तिच्यात नाही असं सांगत साजिदनं तिचा खूप अपमान केला होता. त्यानंतर मला बाहेर काढून त्यानं दार लावून घेतलं. पुढे त्यानं तिच्यासोबत जे काही केलं याची कल्पनाही मला करवत नाही. तो सांगेल ते काम मी करावं आणि त्याचसोबत त्याला शारीरिक सुखही पुरवावं अशी मागणी तो सारखी करायचा. माझं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी त्यानं मला दिली होती. मी त्याकाळात प्रचंड मानसिक धक्क्यातून गेले. माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला मला 7 वर्षे लागली. त्यानं असंख्य मुलींवर असाच अत्याचार केला असणार याची मला खात्री आहे.'
 

 

तसेच करिष्मानेही ट्विटवर आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाचे वर्णन केले आहे. तिने पोस्टद्वारे म्हटले आहे की, 'साजिद खानकडे मी पहिल्यांदा त्याची मुलाखत घेण्यासाठी 2000 साली गेले होते. त्याने मला मुलाखतीसाठी त्याच्या घरी बोलावले होते. मुलाखत घेताना तो त्याच्या गुप्तांगाविषयी आणि तो स्त्रीला समाधानी कसं करु शकतो याविषयीच बोलत होता. मी त्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा मुलाखतीच्या विषयावर आले. तो मला काही डीव्हीडी दाखवण्यासाठी म्हणून खोलीत गेला आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याचा गुप्तांग बाहेर होता. मी लगेच तिथून निघण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याने त्याची जीभ माझ्या गळ्याला लावण्याचा प्रयत्न केला. मी त्याला माझ्यापासून दूर ढकललं आणि तेथून पळ काढला. मी तेथून निघाल्यावर विलेपार्लेला ऑफिसमध्ये पोहेचेपर्यंत रेल्वेत माझ्या प्रवासादरम्यान खूप रडले. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मी त्याची मुलाखत लिहून काढली, कारण ते माझं काम होतं. 

काही वर्षांनंतर, मी एमटीव्ही ला असताना साजिद सोबत काम करण्याची वेळ आली. पण मला त्याच्यासोबत काम करायचे नव्हते. त्यानंतर मला जाणवले की, एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक भावनांवर ताबा ठेवणे शक्य नाही, म्हणून मी, मला आलेली चांगली संधी का गमवावी....? या कामाच्यावेळी त्याच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच मी त्याला नीट वाग, असे खडसावले. त्यावर त्याचे उत्तर होते जे मी कधीही विसरु शकत नाही, 'तू आता आधीपेक्षा जाड झाली आहेस. आता मी तुला हात लावणार नाही.' आणि तो हसायला लागला.' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MeToo actress saloni chopra and woman journalist accuses director sajid khan for sexual harassment