मिस वर्ल्डला अभिनयात नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचंय करिअर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं नसून मानुषी छिल्लर​ने करिअरसाठी वेगळ्या क्षेत्राची निवड केली आहे. या क्षेत्राविषयी मानुषीने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचं ऐकायला मिळालं. मानुषीने या मुलाखतीत तिला अभिनेत्री व्हायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर भारतीय मुलींनी करिअरसाठी आपले पाऊल बॉलिवूड कडे वळवले. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. ती मध्यंतरीच्या काळात काही जाहीरातींमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत दिसली. त्यानंतर तिच्या बॉलिवूड पदार्पणाची चिन्हे दिसू लागली.

नृत्यदिग्दर्शक व दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक करण जोहर मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं बोललं जात होतं. मानुषीने मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं नसून तिने करिअरसाठी वेगळ्या क्षेत्राची निवड केली आहे. या क्षेत्राविषयी मानुषीने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचं ऐकायला मिळालं.

मानुषीने या मुलाखतीत तिला अभिनेत्री व्हायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. मानुषी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असून तिला अभिनेत्री न होता हृदयरोग तज्ज्ञ व्हायचं आहे. अभिनेत्री होणं हे तिचं स्वप्न कधीच नव्हतं. तिने कायम एक गुणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आहे, असं स्पष्ट केलं. 

मानुषी म्हणाली, 'मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर माझ्यावरील जबाबदाऱ्या पार पाडताना मला माझ्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नव्हतं. वैद्यकीय शिक्षणातून तुम्हाला जीवनात बऱ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यामुळेच मला माझं वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडायचं नाही. मी काही काळ ब्रेक घेऊन माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे.'

 

Web Title: miss world manushi chhillar wants to complete mbbs study and  not interested in bollywood