मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नकोस, मनसेची कंगनाला धमकी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 4 September 2020

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. तसंच मुंबई बद्दल बोलताना तिने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखवला. यानंतर कंगना तिच्या स्टेटमेंटमुळे ट्रोल व्हायला लागली.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला दररोज नवीन वळण मिळत आहे. सुशांत मृत्यु प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत सातत्याने तिचं मत मांडत आहे. केवळ मत मांडून ती थांबत नाही तर अनेकांवर आरोप-प्रत्यारोप करत वादांना निमंत्रण देत आहेत. नुकतीच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. तसंच मुंबई बद्दल बोलताना तिने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखवला. यानंतर कंगना तिच्या स्टेटमेंटमुळे ट्रोल व्हायला लागली. चाहत्यांसोबतंच अनेक सेलिब्रिटींनीही कंगनावर टीकेची झोड उडवली. यातंच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे.

हे ही वाचा: कंगना रनौत म्हणाली, '९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर..'

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनावर निशाणा साधत तिला धमकी वजा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट करुन त्यांची भूमिका मांडली आहे. अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन कुणीही 'पंगा' घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहीणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात याला कारण आहेत माझे मुंबई पोलिस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो पाऊस असो, कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भिती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला.पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही. ' अशा शब्दात अमेय खोपकर यांनी कंगानाच खडे बोल सुनावले आहेत.

काही दिवसांपूर्वी कंगनाचं मुंबई पोलिसांसोबत ट्विटरवॉर देखील झालं होतं. एकुणंच मुंबईशी संबंधित तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता तर कंगनाने ओपन चॅलेंज देत 'मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवून दाखवा' असं म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे.   

mns leader amey khopkar reaction on kangana ranauts mumbai is feeling like pok  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader amey khopkar reaction on kangana ranauts mumbai is feeling like pok