मला ॲक्‍टर नाही तर सीए बनायचे होते

monalisa bagal
monalisa bagal

प्रीमियर - मोनालिसा बागल, अभिनेत्री
अभिनय आणि माझा दूर-दूरपर्यंतही संबंध नव्हता. मला ॲक्‍टर नाही तर सीए बनायचे होते. पण, नशिबात जे असते तेच आयुष्यात घडते. मला ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर यांच्या लहानपणाची भूमिका करण्याची संधी मिळाली. यानंतर इंडस्ट्रीमध्ये माझी ओळख लहान सई ताम्हणकर म्हणून झाली. तसेच पुढे कित्येक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. परंतु, या क्षेत्रात फारसा रस नसल्यामुळे मी या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. कारण सीए व्हायचे आहे, हेच विचार सातत्याने माझ्या डोक्‍यात असायचे. काळानंतर मला आणखी एका चित्रपटाची ऑफर आली आणि मी त्यात काम करायचे ठरवलेसुद्धा! तो सिनेमा होता ‘झाला बोभाटा’. सिनेमा रिलीज झाला तेव्हा माझे नाव एका पुरस्कारासाठी नामांकित झाले. मला त्या क्षणी हे जाणवले, की खरेच माझ्यामध्ये ती कला आहे, म्हणूनच मला आज इतक्‍या चित्रपटांच्या ऑफर येत आहे. त्यानंतर मी ठरवले, मला याच क्षेत्रात काम करायचे आहे. 

पुढे मला ‘ड्राय डे’, ‘पैंजण’, ‘परफ्युम’ अशा कित्येक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर मला यांतील काही चित्रपटांसाठी पुरस्कारदेखील मिळाले. पण, इतक्‍या सिनेमांमध्ये काम केल्यानंतरदेखील मला कोणता सिनेमा करावा याची फारशी कल्पना नसायची. मिळेल त्या चित्रपटात काम करायचे. नंतर मी फिल्म डिस्ट्रिब्यूशनमध्ये पाऊल टाकले. या वेळी मला समजले, की प्रत्यक्षात प्रेक्षकांना कशा प्रकारचे चित्रपट बघायला आवडतात. हा अनुभव माझ्यासाठी मोलाचा ठरला. आता मी कोणतेही चित्रपट करण्यापूर्वी प्रेक्षकांना तो आवडेल का, हा विचार करूनच काम करते. कोणत्याही कलाकारासाठी नेमका चित्रपट काय आहे, त्याच्या माध्यमातून कशा प्रकारचा संदेश आपण देणार आहोत, या सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. फक्त अभिनयाची संधी मिळत आहे, म्हणून काम करायला नको. 

मी लहान असतानाच माझ्या बाबांचे निधन झाले. पण, मला माझ्या आईने प्रत्येक पावलावर साथ दिली. आईला कॅन्सर होता. तब्बल पाच वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. माझ्या आयुष्यात एक असा क्षण आला, की माझा एक चित्रपट फ्लॉप झाला. तेव्हा मी या क्षेत्रात पुन्हा काम नाही करायचे, असे ठरवले. परंतु, अशा अवस्थेतसुद्धा तिने मला धीर दिला. या क्षेत्रात नाव करण्यासाठी आई तिच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत मला सतत प्रेरणा देत राहिली. मी अभिनयाच्या क्षेत्रात जे काही नाव कमवले आहे, त्याचे पूर्ण श्रेय माझा आईचे आहे. 

अभिनयाबरोबर मला गायनाची आणि ट्रेकिंगचीसुद्धा आवड आहे. मी आजपर्यंत कोणत्याही मालिकेत काम केले नाही, पण भविष्यात वेबसीरिज करायला मला नक्कीच आवडेल. सध्या मी दोन चित्रपटांमध्ये काम करत आहे आणि लवकरच ‘भीरकीट’, ‘नेकलेस’ आणि ‘तू फक्त हो म्हण’ हे माझे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 
(शब्दांकन - अक्षता पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com