
२० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) निमित्ताने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जब्बार पटेल यांनी जावेद अख्तर यांच्याशी अनेक जुन्या-नव्या विषयांवर संवाद साधला.
PIFF : आगामी काळात चित्रपट अधिक नैसर्गिक आणि वास्तववादी - जावेद अख्तर
पुणे - ‘जुन्या काळातील चित्रपटाचे (Movie) लिखाण (Writing) पाहता आजच्या चित्रपटांमध्ये वास्तविकता मांडण्यात येत आहे. सध्याची नवी पिढीला (New Generation) सामाजिक भान व जाणीव आहे. तसेच ते चांगल्या दर्जाचे चित्रपट बनविण्यावर भर देत असून आगामी काळात चित्रपट अधिक नैसर्गिक (Natural) आणि वास्तववादी (Realistic) असतील. असे मत कथालेखक व गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी व्यक्त केले.
२० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) निमित्ताने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत. या प्रसंगी ‘पिफ’चे संचालक संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जावेद अख्तर यांच्याशी अनेक जुन्या-नव्या विषयांवर संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील अख्तर यांनी दिलखुलास उत्तरे दिली.अख्तर म्हणाले, ‘‘कोरोना काळात दोन कथालेखन केले आहे. पण केवल लिखाण करणे हे महत्त्वाचे नाही तर, ती निर्मात्याला पटेल का हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या २० ते ३० वर्षापूर्वी चित्रपटांसाठी करण्यात येणारे लेखन आता पूर्णपणे बदलत आहे. आताच्या काळात चित्रपटांचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या लेखनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतकंच नाही तर, सामान्य व्यक्ती स्वतःला या कथेशी जोडू शकेल असे लेखन असावे.
बदलता चित्रपट या विषयावर बोलताना अख्तर म्हणाले, ‘‘५० च्या दशकातील नायक हा कामगार वर्गातून येणारा होता. मात्र ९० च्या दशकात नायक हा कामगार वर्गातील नव्हता. त्याला या देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. आता पुन्हा गोष्टी बदलत आहे. आता चित्रपटांमध्ये छोट्या गावांचे चित्रण केले जात असून हे चित्रपट मोठ्या शहरातील लोक मल्टिफ्लेक्समध्ये बघत आहेत.’’ आपण एक देश म्हणून चित्रपटांवर प्रेम करतो. ते प्रेम आपल्या हजारो वर्षांच्या अनेकविध कलांमधून आले आहे. आपण गाण्यांसह चित्रपट बघणे पसंत करतो आणि यामध्ये भाषा महत्त्वाची आहे. भारतामध्ये अनेकविध भाषा आणि कला आहेत आणि आपण त्याचा आस्वाद घेण्यासाठी भाषेच्या भिंती ओलांडून जायला हवे, असे ही त्यांनी नमूद केले.
चित्रपटगृहांची संख्या कमी
देशातील लोकसंख्या पाहता चित्रपटगृहांची संख्या खूप कमी आहे. परिणामी तिकिटांचे दर देखील जास्त आहेत. यासाठी राज्याबरोबर केंद्र शासनाने राज्याराज्यांमध्ये चित्रपटगृहांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सरकारने चित्रपटाला निधी देण्यापेक्षा ते प्रदर्शित कसे होतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त चित्रपटगृहे तयार केले पाहिजेत. त्याचबरोबर या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काही मार्गदर्शन तत्त्वे आखले तर नक्कीच प्रेक्षकांना ही चांगल्या दर्जाचे चित्रपट पाहायला मिळतील. त्यामुळे चांगल्या चित्रपटांना आणि निर्मात्यांना ही याचा फायदा होईल.
नव्या काळातील ओटीटीचे महत्त्व
आताच्या पिढीला मोबाईल हा साधन उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ओटीटी सारख्या माध्यमाला प्राधान्य दिले जात आहे. ओटीटी हे सर्जनशील माध्यम असून त्याचा वापर फायदा निर्माते आणि प्रेक्षक या दोन्ही घटकांना होतो. बऱ्याचदा असे सामाजिक विषय असतात ज्यांना काही तासांच्या चित्रपटातून लोकापर्यंत पोचविणे शक्य नसते. अशा विषयासाठी ओटीटी हा योग्य पर्याय ठरतो. नक्कीच यामध्ये दाखविण्यात येणाऱ्या विषय आणि भाषा बोल्ड असते म्हणून ओटीटीवरील चित्रपट किंवा सिरिज बघणे चुकीचे असे नाही. त्यातून मांडण्यात येणारा संदेश याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज समाज मध्यमावर अगदी जुन्या काळातील चित्रपट ही उपलब्ध आहेत.
मातृभाषा येणे आवश्यक
आज कोणत्याही क्षेत्रात इंग्रजीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे इंग्रजी ही काळाची गरज झाली आहे. याचा अर्थ असा नाही की तरुणांनी मातृभाषेला दुर्लक्ष करावे. मातृभाषेशिवाय व्यक्तीचे अस्तित्व नाही. मातृभाषा येत नसेल तर आपली संस्कृती आणि परंपरेशी नाते तुटेल. मुंबईमध्ये आल्यानंतर मला समजले की मराठीमध्ये किती समृद्ध ज्ञान आहे. माझ्यामते विजय तेंडुलकर हे भारतातील सर्वश्रेष्ठ नाटककार आहेत. असे ही अख्तर यांनी सांगितले.