
Jhund:नागराजच्या 'झुंड'चं नागपूर कनेक्शन!
नागराज मंजुळेचा(Nagraj Manjule) बहुचर्चित 'झुंड'(Jhund) हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाला. अन् संपूर्ण महाराष्ट्रभरात नव्हे भारतभरात अमिताभ(Amitabh Bachchan) यांनी साकारलेल्या विजय बारसे(Vijay Barse) या व्यक्तिरेखेची चर्चा सुरू झाली. आता विजय बारसे हे फुटबॉल प्रशिक्षक आहेत हे ठाऊक होतं. पण त्यातही विशेष म्हणजे ते झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देऊ आयुष्य योग्य पद्धतीनं जगायला शिकवणारं एक थोर व्यक्तिमत्त्व देखील आहे. त्यांनीच 'स्लम सॉकर' ही नवीन संकल्पना जन्माला घातली. त्यामागे एक कहाणी आहे अन् ती संकल्पना पूर्णत्वाला नेण्याच्या संघर्षाचा प्रवास ही दुसरी संघर्षकहाणी म्हणावी लागेल. विजय बारसे ही व्यक्तिरेखा अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' सिनेमात साकारली आहे ते मुळचे नागपुरचे. त्यांनी जवळ-जवळ २१ वर्षांपूर्वी 'स्लम सॉकर' अर्थात 'झोपडपट्टी फुटबॉल'ची सुरुवात केली होती.
आता नागराजचे सिनेमे हे समाजमनाचा खरा आरसा. त्याच्या सिनेमात सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार तसा कमी पहायला मिळतो. तो जसं प्रत्यक्षात आहे,घडलंय तसंच सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अर्थातच विजय बारसे हे व्यक्तिमत्त्व नागराजला भुरळ पाडून गेलं. त्या विजय बारसेंविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर,विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील व्यसनांच्या,अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांना गुन्हेगारी विश्वापासनं लांब करण्यासाठी या 'स्लम सॉकर' संकल्पनेला जन्म दिला. नागपुरातील बोखारा भागात झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय करीत अशी निवासी प्रशिक्षण संस्था सुरू केली. क्रीडा आणि अभ्यास दोन्ही प्रकारात गरीब मुलांना संधी उपलब्ध करून दिली की ते आपल्या यशाचा मार्ग स्वतः निवडतील.
टप्प्या-टप्प्याने स्लम सॉकरचा ग्राफ वाढत गेला. सुरुवातीला नागपूर,नंतर विदर्भ आणि हळूहळू महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यात तसंच देशाच्या २४ राज्यात स्लम सॉकर पसरलं. गेल्या दोन दशकात दरवर्षी जवळजवळ 'स्लम सॉकर' स्पर्धांमध्ये ४ लाख मुलांनी सहभाग घेतला आहे. विजय बारसेंमुळे झोपडपट्टीतील मुलांनी केवळ खेळात नाही तर शिक्षणातही प्राविण्य मिळवले आहे. नागराज मंजुळेनं हे करारी व्यक्तिमत्त्व टिपलं अन् त्यांच्या संघर्षावर सिनेमा करायचं ठरलं. 'झुंड' हा नागराजचा सिनेमा त्यातनंच जन्माला आला. अमिताभ बच्चन यांच्याशिवाय दुसरी कोणीच ही जिवंत व्यक्तिरेखा जशीच्या तशी प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकणार नाही हा नागराजचा विचार आज सिनेमा पाहिल्यावर सार्थकी लागला असं प्रत्येकजण म्हणतोय. आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'झुंड' च्या या नागपूर कनेक्शनचं कौतूक जगभरातनं होतंय.