
मी स्वप्नातही विचार केला नव्हता... 'झुंड'च्या खऱ्या नायकाची प्रतिक्रिया
Football Coach Vijay Barse Reaction Nagraj Manjule Jhund Movie : नागपूर : आज नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपट (Nagraj Manjule Jhund Movie) प्रदर्शित झाला. महानायक अमिताभ बच्चन यांनी फूटबॉल कोच विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देऊन फूटबॉल खेळाडू घडवलेत. त्यांच्यावरच आधारित हा चित्रपट आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रशिक्षक विजय बारसे (Football Coch Vijay Barse) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी माझी कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. पण, आज तो दिवस उगवला आहे. पण, माझ्यापेक्षा ही प्रत्येक खेळाडूची गोष्ट आहे. या खेळाडूंनी माझं आयुष्य सार्थकी लावलं. त्यांनी सर्व परिस्थितीवर मात करून मोठ नाव कमावलं, त्या सर्व खेळाडूंची ही कहाणी आहे, असं विजय बारसे म्हणाले.
विजय बारसे हे फुटबॉल प्रशिक्षक आहेत. त्यांनी 'स्लम सॉकर' ही नवीन संकल्पना जन्माला घातली. त्यांनी जवळपास २१ वर्षांपूर्वी 'झोपडपट्टी फुटबॉल'ची सुरुवात केली. यामध्ये त्यांनी झोपडपट्टीतील व्यवसनांच्या, अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांना फुटबॉल खेळायला शिकवले. या मुलांना गुन्हेगारी विश्वापासून लांब ठेवणे हाच एक उद्देश होता. त्यासाठी त्यांनी 'स्लम सॉकर' ची स्थापना केली. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांच्यासाठी निवासी प्रशिक्षण संस्था सुरू केली. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याच जीवनावर नागराज मंजुळे यांनी चित्रपट बनवला आहे.