Mothers Day: मराठी अभिनेत्री सोनालीची ‘मायलेक’ ची घोषणा|Mothers Day Special 2022 Actress Sonali Khare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Film Production

Mothers Day: मराठी अभिनेत्री सोनालीची ‘मायलेक’ ची घोषणा

Marathi News: मराठी मनोरंजन विश्वाविषयी बोलायचे झाल्यास सध्या वेगवेगळ्या (Marathi Entertainment) विषयांवरील चित्रपट प्रतिक्षा यादीत आहे. त्यांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी चित्रपटाला मोठा फटका (Marathi Movie) बसला होता.आता मात्र ती उणीव भरुन काढण्याचे काम प्रामुख्यानं काही चित्रपट करताना दिसत आहे. एवढेच नाहीतर आता जगप्रसिद्ध अशा कान्स चित्रपट महोत्सवामध्ये तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. त्यावरुन मराठी चित्रपटांना साता समुद्रापार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन (Tv entertainment) विश्वातील अभिनेत्री दुहेरी भूमिकेत येत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील तिचा फॅन क्लब मोठा आहे. आता ती एका तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मातृदिनाचे खास निमित्त साधत सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे. नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाबदल निर्माती सोनाली खरे म्हणते, " मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या खास दिनी माझा पहिला चित्रपट ‘मायलेक'ची घोषणा करणे, हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. लवकरच ‘मायलेक’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील." या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे.