कान्समध्ये रंगला 'दशक्रिया'चा खेळ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' सोमवारी संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा पहिला खेळ झाला. फ्रान्सच्या ग्रे या प्रेक्षागृहात हा विशेष खेळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

मुंबई: जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' सोमवारी संजय पाटील लिखित आणि संदीप पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा पहिला खेळ झाला. फ्रान्सच्या ग्रे या प्रेक्षागृहात हा विशेष खेळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा 'आँखो देखा हाल' पाहण्यासाठी या चित्रपटाची टीम उपस्थित होती. 

या चित्रपटाचा दुसरा खेळही लवकरच होणार आहे. 'दशक्रिया' या चित्रपटास आधी राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार, संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार अशा विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

नुकत्याच जाहीर झालेल्या नवव्या 'निफ' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दशक्रिया' चित्रपटाला तब्बल 11 विभागांमध्ये नॉमिनेशन जाहीर झाले आहे. यामध्ये बेस्ट अनरिलीज फिल्म निर्मिती व दिग्दर्शन, तसेच डेब्यू दिग्दर्शन, प्रमुख अभिनेता, सहाय्यक अभिनेता, बालकलाकार, सर्वोत्कृष्ठ कथा, पटकथा, गीते, छायाचित्रण, संगीत, गायक, गायिका तसेच आपली वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल 'विशेष पुरस्कार' अशा विभागांचा समावेश आहे. 

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, प्रशांत तपस्वी, अनिल रबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासोबत आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत. 
 

 
 

Web Title: movie Dashkriya in Cannes