नवा चित्रपट : शिवाय 

महेश बर्दापूरकर
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

अजय देवगणची प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन असलेला 'शिवाय' हा चित्रपट मोठ्या झोकात सुरू होतो; मात्र नंतरच्या प्रत्येक मिनिटाला ढासळत जातो. कथा आणि पटकथेतील अनेक त्रुटी, ढिसाळ दिग्दर्शन, अजय देवगण सोडल्यास इतर कलाकारांचा बेतास बात अभिनय, निराशा करणारं संगीत, लांबलेला शेवट, यांमुळे हा चित्रपट असह्य होतो. 

अजय देवगणची प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन असलेला 'शिवाय' हा चित्रपट मोठ्या झोकात सुरू होतो; मात्र नंतरच्या प्रत्येक मिनिटाला ढासळत जातो. कथा आणि पटकथेतील अनेक त्रुटी, ढिसाळ दिग्दर्शन, अजय देवगण सोडल्यास इतर कलाकारांचा बेतास बात अभिनय, निराशा करणारं संगीत, लांबलेला शेवट, यांमुळे हा चित्रपट असह्य होतो. 

'शिवाय'ची कथा कुठं तरी हिमालयातील पर्वतरांगांमध्ये सुरू होते. शिवाय (अजय देवगण) या परिसरात ट्रेकिंग करायला आलेल्यांचा गाइड, म्हणून काम करत असतो. त्याची भेट बल्गेरियाची रहिवासी असलेल्या (ओल्गा) इरिका कार हिच्याशी होते. शिवाय तिला बर्फाच्या वादळातून वाचवतो आणि दोघं प्रेमात पडतात. इरिका गरोदर राहते; मात्र तिला तिच्या करिअरसाठी पुन्हा आपल्या देशात जायचं असतं. शिवायला मात्र मूल हवं असतं. शेवटी मुलीला जन्म दिल्यानंतर इरिका निघून जाते व शिवाय गौराला (एबिगेल इएम्स) एकट्यानंच वाढवतो; मात्र नऊ वर्षांच्या झालेल्या गौराला तिच्या जन्माचं रहस्य समजतं आणि नाइलाजास्तव शिवाय तिला तिच्या आईला भेटण्यासाठी बेल्जिअमला जाण्याचा निर्णय घेतो. तिथं पोचताच शिवाय मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीशी पंगा घेतो आणि ते गौराचंच अपहरण करतात. मुलाला वाचवण्यासाठी शिवाय शोधमोहीम आखतो. या कामात त्याला भारतीय एम्बसीमधील कर्मचारी (अनुष्का) सायेशा सहगल मदत करते. एक कॉम्प्युटर हॅकर (वीर दास) मदतीचा हात पुढं करतो. बर्फाच्या डोंगरात तुफान हाणामाऱ्या झाल्यानंतर अगदीच अपेक्षित शेवटासह चित्रपट संपतो. 

चित्रपटाच्या कथेमध्ये ताळमेळ दिसतच नाही. हिमालयात डोंगरावरून उड्या मारत खाली येणारा आणि सैनिकांना भेटणारा शिवाय दिसतो; मात्र तो गाइड असल्याचं स्पष्ट होतं. त्याची आणि ओल्गाची प्रेमकथाही खूपच वरवरची. टिपिकल हिंदी चित्रपटांप्रमाणं ओल्गाचं आई बनणं, त्यासाठीचा ड्रामा आणि परत जाणं या घटनाक्रमानंतर चित्रपट बराच काळ रेंगाळतो. बेल्जिअममध्ये गौराच्या अपहरणानंतर चित्रपट वेग पकडतो. या प्रसंगातील पाठलाग श्‍वास रोखून ठेवायला लावतो; मात्र हा प्रसंग लांबल्यानं त्याचा परिणामही नंतर शून्य होतो. मध्यंतरानंतर घुसडलेली अनावश्‍यक पात्रं आणि उगाच लांबलेल्या प्रसंगांमुळं कथा हरवत जाते. दिग्दर्शकानं कथा आणि पटकथेपेक्षा ऍक्‍शनकडंच अधिक लक्ष दिल्यानं प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत होतो. तुफान हाणामारीनंतर चित्रपटाचा शेवट होणं अपेक्षित असताना उगाच काही तरी हळवं दाखविण्याच्या नादात अपेक्षित परिणामही चित्रपट गमावून बसतो. 

अजय देवगणच्या अभिनयानं चित्रपटाला थोडंफार तारलं आहे. हाणामारीबरोबरच हळव्या प्रसंगांमध्येही तो उठून दिसतो. (मात्र, दुर्दैवानं त्याच्यातील दिग्दर्शकानंच कलाकाराला मारलं आहे.) इरिका कारनं ओल्गाच्या भूमिकेत बरं काम केलं आहे. सायेशा सहगलला फारशी संधी नाही. गिरीश कर्नाड यांना वाया घालवलं आहे. एबिगेल इएम्स ही बालकलाकार छाप पाडते. (मुक्‍या मुलीचं हे पात्र थेट 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीच्या भूमिकेवरून उचलल्यासारखं दिसतं.) हिमालयातील चित्रण व बेल्गेरियामधील लोकेशन्स या थोड्या जमेच्या बाजू. एकंदरीतच, केवळ ऍक्‍शनच्या आहारी गेल्यानं हा चित्रपट कथा, पटकथा व दिग्दर्शनाशिवाय राहतो आणि त्यामुळंच प्रभावशून्य होतो. 

श्रेणी : 2 
 

  • निर्माता व दिग्दर्शक : अजय देवगण 
  • भूमिका : अजय देवगण, सायेशा सेहगल, इरिका कार, एबिगेल इएम्स, वीर दास, गिरीश कर्नाड, सौरभ शुक्‍ला. 
Web Title: Movie Review of Shivaay