"डबिंग'मधून साधणार प्रादेशिक समरसता : मित्तल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या क्षमता अधिक वाढाव्यात, या दृष्टीने येत्या काळात काही महत्त्वाची पावलं नक्कीच उचलण्यात येतील. आवश्‍यकता भासल्यास चित्रपट रिळांची साठवण क्षमता अतिरिक्त जागेत वाढविण्यात येईल. 
- अजय मित्तल, सचिव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय

केंद्र सरकारचे प्रयत्न; विविध भाषांतील चित्रपटांचे अनुवाद करण्याची अभिनव योजना 

पुणे : "विविध भाषांतील चित्रपट "डबिंग'च्या माध्यमातून अनुवाद करून ईशान्येकडील भाषांत दाखविण्याची, तसेच ईशान्येच्या चित्रपटांचा अनुवाद इतर भाषांत आणण्याची एक अभिनव योजना केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात येत आहे. याची सुरवात आधी लहान मुलांसाठीच्या चित्रपटांच्या डबिंगने होईल,'' अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली. 

ईशान्य भारत चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनानिमित्त मित्तल पुण्यात आले असता पत्रकारांशी संवाद साधला. भविष्यातील प्रादेशिक समरसतेविषयी त्यांनी माहिती दिली. 

मित्तल म्हणाले, ""ईशान्येत लहान मुलांसाठी विविध चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहेत. ईशान्येत फक्त आदिवासी संस्कृतीच आढळून येते, असे मानणे चुकीचे आहे. तिकडच्या राज्यांतही बुद्धी, कौशल्य आणि आधुनिक जीवन पद्धतीचा संगम दिसून येतो. खरी गरज आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांच्याशी स्वतःला जोडून घेण्याची.'' पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर देशात इतरत्र असे संग्रहालय सुरू करण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नाही.'' 
आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नामवंत चित्रपट महोत्सवात अंतिम टप्प्यावर पोचणाऱ्या भारतीय चित्रपटांना तेथे आवश्‍यक "लॉबिंग' आणि प्रसिद्धीसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या योजनेचा लाभ निर्मात्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

प्रादेशिक वाहिन्यांना मदत 
देशातील विविध भागांत सुरू असणाऱ्या दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून आर्थिक मदत दिली जाते. काही कारणांनी ही मदत थांबली असल्यास त्याची कारणे तपासून मदत पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील अजय मित्तल यांनी दिली. 

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या क्षमता अधिक वाढाव्यात, या दृष्टीने येत्या काळात काही महत्त्वाची पावलं नक्कीच उचलण्यात येतील. आवश्‍यकता भासल्यास चित्रपट रिळांची साठवण क्षमता अतिरिक्त जागेत वाढविण्यात येईल. 
- अजय मित्तल, सचिव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय  
 

Web Title: multi langues movie dubbing from central government : mittal