esakal | 'मनी हाईस्ट ५'च्या प्रदर्शनाविषयी 'नेटफ्लिक्स'ची महत्त्वपूर्ण माहिती

बोलून बातमी शोधा

alvaro morte

'मनी हाईस्ट ५'च्या प्रदर्शनाविषयी 'नेटफ्लिक्स'ची महत्त्वपूर्ण माहिती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'ला कासा दे पापेल' (La Casa De Papel) या स्पॅनिश वेब सीरिजची इंग्रजी आवृत्ती 'मनी हाईस्ट' (Money Heist) प्रचंड लोकप्रिय आहे. जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या या सीरिजचा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मने दिली आहे. जगभरातील 'मनी हाईस्ट'चे चाहते त्याच्या पाचव्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा पाचवा भाग या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात येत आहे.

आता जून महिन्यात या सीरिजचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती 'नेटफ्लिक्स'ने दिली. याचसोबत 'नेटफ्लिक्स'वरील इतर लोकप्रिय सीरिज 'द विचर सिझन २', 'यू सिझन ३', 'सेक्स एज्युकेशन सिझन ३', 'लॉस्ट इन स्पेस सिझन ३', 'कोब्रा काई सिझन ४' हे ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत प्रदर्शित होणार आहेत. 'स्ट्रेजर थिंग्स' या लोकप्रिय सीरिजचा चौथा सिझन या वर्षाअखेर किंवा २०२२ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : 'फेशिअल ट्रिटमेंट' पडली महागात; अभिनेत्रीच्या बिघडलेल्या चेहऱ्याबाबत डॉक्टरांचं स्पष्टीकरण

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 'मनी हाईस्ट'चा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये पाचव्या सिझनची तयारी सुरू झाली होती. मात्र प्रॉडक्शनचं काम रखडल्यामुळे आणि कोरोनाच्या संकटामुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे.

काय आहे मनी हाईस्ट?

स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेल्या आठ जणांना एकत्र आणून 'प्रोफेसर' हा चोरीचा मोठा कट रचतो. सध्या जगभरात लोकप्रियता मिळवलेली ही सीरिज एकेकाळी सुपरफ्लॉप ठरली होती. मात्र 'नेटफ्लिक्स'ने या सीरिजला दत्तक घेतल्यानंतर आणि त्याचे विविध भाषेत रुपांतर केल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.