'घाबरलं तर बोलायचं नायं'; 'बळी'चं पोस्टर व्हायरल

new Marathi horror movie Bali poster released on social media
new Marathi horror movie Bali poster released on social media

मुंबई -  मराठीमध्ये भयपटांची काही कमी नाही. आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारचे भयपटांनी मराठी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता अभिनेता स्वप्निल जोशीचा एक नवा भयपट पुढील महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. जीसिम्सची निर्मिती असलेल्या प्रस्तुतकर्ते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नवीन व बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. आधीच उत्तम अशी निर्मितीमुल्ये जपणाऱ्या टीमचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिलेल्या ‘बळी’च्या या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

‘बळी’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे आहे. प्रेक्षकांचा लाडका स्टार स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर स्वप्निलचा अगदी घाबरवून टाकणाऱ्या अदेतील चेहरा आहे. अत्यंत रक्तरंजित अशा मनगटांनी त्याचा चेहरा घट्ट पकडला असून स्वप्निलच्या चेहऱ्यावर रक्ताचे लोट दिसत आहेत. ज्याच्या मनगटांमध्ये स्वप्निलचा चेहरा जखडला आहे, त्याचा चेहरा दिसत नसला तरी तो खूप भयावह आहे, हे जाणवते. स्वप्निलच्या डोळ्यांतील अंगार हे पोस्टर पाहणाऱ्याच्या काळजात धडकी भरविल्याशिवाय राहत नाही. त्यातच या पोस्टरवरील ‘कोण आहे एलिझाबेथ?’ हा प्रश्न आणखी अनेकानेक प्रश्न निर्माण करतो.

 प्रेक्षकांसाठी हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. त्याची प्रचिती त्याचे पोस्टर पाहिल्यावर येते. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आता झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-२’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. 

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.”  ते पुढे म्हणतात, “अर्जुन आणि कार्तिक यांच्यासारखे उत्तम निर्माते या माझ्या दुसऱ्या हॉरर चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटासाठी मला स्वप्निलसारखा स्टार मिळाला आहे.

या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com