"एनएफएआय'कडे अप्रदर्शित चित्रपटांचा संग्रह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

""राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने वर्षभरात सात हजार 500 छायाचित्रे, चार हजार पोस्टर्स आणि दोन हजार 500 सॉंग बुकलेट्‌स संग्रहित केले आहेत. त्यामुळे संग्रहालयात एकूण दीड लाख छायाचित्रे, 27 हजार पोस्टर्स आणि 17 हजार सॉंग बुकलेट्‌सचा संग्रह आहे,'' असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले.
 

पुणे : भारतीय आणि बंगाली चित्रपटांतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ऋत्विक घटक. मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत; परंतु घटक यांचे अपूर्ण राहिलेले आणि प्रदर्शित होऊ न शकलेले अनेक चित्रपट आजही आहेत. हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संकलित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

या प्रयत्नांना आता यश येत असून, पश्‍चिम बंगाल सरकारने घटक यांचे "काटो अजनारे' (1959), "बनगार बगो दर्शन' (1964) आणि "रंजर गुलाम' (1968) हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केले आहेत.
घटक यांच्या अपुरे राहिलेल्या किंवा प्रदर्शित होऊ न शकलेल्या बहुतांश चित्रपटांच्या चित्रफितींचे संकलन आता चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध असणार आहेत. यात घटक यांचे 1959 ते 1971 या कालावधीतील चित्रपटांचा समावेश आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. घटक यांच्या "तिताश एकती नदिर नाम' (1973) या चित्रपटाची माहिती पुस्तिका, तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या "शहजादी मुमताज' (1977) आणि बाबजीराव राणे दिग्दर्शित "संत तुकाराम' (1932) या चित्रपटांची छायाचित्रे, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रदर्शित होऊ न शकलेला "जमानत' हा चित्रपट आणि ज्योतिप्रसाद आगरवाल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला आसामी चित्रपट "जोयमती' (1935)ची छायाचित्रे आणि प्रेसक्‍लिपिंग उपलब्ध झाली आहे.

मगदूम म्हणाले, ""घटक यांचे बहुतांश चित्रपट आता संग्रहालयात असणार आहेत. त्यांच्या चित्रपटांचा शोध गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होता. त्यासाठी पश्‍चिम बंगाल सरकार आणि ऋत्विक घटक मेमोरिअल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले.''

 

Web Title: NFAI collection of unreleased films