नितीन शंकर अन्‌ वर्ल्ड क्‍लास म्युझिक...!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 22 मे 2019

नितीन शंकर मूळचे कोल्हापूरचे. संगीताच्या ध्यासापोटी त्यांनी मुंबई गाठली. अर्थात संघर्ष त्यांच्या वाट्याला होताच. पण, अनेक अडचणींवर मात करून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या करियरला प्रारंभ झाला.

संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच प्रेरणा देत राहिला...प्रसिद्ध संगीतकार नितीन शंकर संवाद साधत असतात आणि त्यांच्या प्रवासातील विविध पदर उलगडत जातात.  

नितीन शंकर मूळचे कोल्हापूरचे. संगीताच्या ध्यासापोटी त्यांनी मुंबई गाठली. अर्थात संघर्ष त्यांच्या वाट्याला होताच. पण, अनेक अडचणींवर मात करून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांच्या करियरला प्रारंभ झाला. ‘खामोशी-दि म्युझिकल,’ ‘खिलाडी,’ ‘हम दिल दे चुके सनम,’ ‘बाजीगर,’ ‘बॉर्डर,’ ‘डीडीएलजे’ चित्रपटातील गीतांपासून ‘पुंगी बजाके,’ ‘माशाल्ला,’ ‘चिंता ता चिता,’ ‘फेव्हिकॉल से’ अशा गाण्यांचे रिदम कंपोझिंग त्यांनी केले. ही यादी तशी फार मोठी आहे. बॉलीवूडबरोबरच विविध प्रादेशिक भाषांतील चित्रपट आणि म्युझिक अल्बमना त्यांनी संगीत दिले. 

आशा भोसले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी तयार केलेला ‘प्रेसीयस प्लॅटिनम’ हा अल्बम वर्ल्ड क्‍लास म्युझिकमध्ये सर्वाधिक पसंतीचा ठरला. ‘माई’ हा चित्रपटही त्यांनी तयार केला. ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी पहिल्यांदाच या चित्रपटात अभिनय केला. आर. डी. बर्मन, कल्याणजी-आनंदजी, जतीन-ललित, इस्माईल दरबार यांच्यापासून ते साजिद-वाजिद यांच्यापर्यंत बॉलिवूडच्या आघाडीच्या सर्व संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. अर्थातच हा अनुभवच इतका दांडगा आहे, की त्यांनी एखादी संकल्पना पुढे आणावी आणि ती यशस्वी न व्हावी, असे कधीच झाले नाही. 

ते सांगतात,‘‘जगभर फिरतो आणि संगीताचे अनेक प्रवाह अनुभवतो. पण, मराठी मातीतला ‘झिम्मा’ हा प्रकार वर्ल्ड क्‍लास म्युझिकमध्ये न्यायचा आहे. बरेच वर्ष ही संकल्पना मनात आहे. पण, पारंपरिक झिम्मा अलिकडच्या काळात फारसा कुठे अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे आता कोल्हापुरात येऊनच तो अनुभवावा लागणार आहे.’’

कलापूरचा संगीताचा वारसा घेऊनच संगीतकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बाहेर पडलो आणि स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आपल्याकडे जी कला असेल त्यात आपण इतके पारंगत असलो पाहिजे, की काही क्षणात आपण आपले ‘टॅलेंट’ सिद्ध केले पाहिजे. 
- नितीन शंकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Shankar Musician interview in Amhi Kolhapuri