
प्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघे यांची भूमिका पण...
प्रविण तरडे (pravin tarde) दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित 'धर्मवीर मु,पोष्ट.ठाणे'(Dharmaveer) हा बहुचर्चित सिनेमा अखेर १३ मे,२०२२ रोजी प्रदर्शित झाला. तब्बल ४०० हून अधिक सिनेमागृहातनं १० हजारांहून अधिक स्क्रीनवर हा सिनेमा झळकला आहे. अर्थात हा सिनेमा दिवंगत शिवसेना नेते,माजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि त्याहून अधिक सर्वांचे लाडके आनंद दिघे साहेब यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे सिनेमाला दमदार प्रतिसाद मिळत आहे.
'धर्मवीर' सिनेमा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरशः गर्दी करत आहेत. दिघेंसारखा(Anand Dighe) सिनेमात हुबेहूब दिसणारा प्रसाद ओक(Prasad oak), दिघे साहेबांसारखीचं प्रसादनं त्याच्या नजरेतनं दाखवलेली जरब, अचूक पकडलेली देहबोली,सिनेमातली संवादफेक हे सारं पाहून 'आनंद दिघे साहेब परत आले' ही भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी या सिनेमानं दोन दोन कोटींची कमाई केली.
या चित्रपटाचे यशाचे श्रेय प्रसाद, प्रवीण आणि निर्मात्यांचे आहेच. पण या भूमिकेसाठी अनेकांची लुक टेस्ट घेतली होती असे वारंवार बोलले जात आहे. निर्माता मंगेश देसाई यानेही मागे आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी स्वतः लुक टेस्ट दिल्याची सांगितले होते. तसेच दिग्दर्शक प्रवीण तरडे यालाही वारंवार एक प्रश्न विचारला जात आहे. तो म्हणजे प्रसाद ओक आधी कोणता नट या भूमिकेसाठी तुमच्या मनात होता.
.
या प्रश्नाला अखेर प्रवीण तरडेने उत्तर दिले आहे. एका माध्यमाशी बोलताना तो म्हणाला, 'आनंद दिघे यांच्यावर चित्रपट करताना तो भव्य आणि खर्चिकच व्हावा असे डोक्यात होते. कारण हा एका मोठ्या व्यक्तीचा जीवनपट आहे. त्यामुळे त्याच्या कास्टिंग वरही भरपूर मेहनत घेतली. अनेकांचे लुक पहिले. प्रसाद ओक हे नाव माझ्या ध्यानीमनीही नव्हते. मी या भूमिकेसाठी अभिनेते आणि दिग्दर्शक विजू माने याचा विचार करत होतो. कारण विजू लहान पणापासून आनंद दिघे यांच्या सानिध्यात राहिला आहे. त्यांचा सहवास त्याला मिळाला आहे. शिवाय दोघांची उंचीही सारखीच आहे. पण नंतर प्रसादचा लुक पहिला आणि संपूर्ण चित्रच पालटलं' असं प्रवीण म्हणाला.