ओम पुरी गेले 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

ओम पुरी यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे शवविच्छेदन अहवालात (पोस्ट मॉर्टेम) म्हटले असले तरी यामध्ये काही गैरप्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी सुरवातीला फेटाळून लावली होती. मात्र, किडवई यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. 

मुंबई - 'ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी हे निधनाआधीच्या रात्री अतिशय अस्वस्थ होते. त्यांना मुलाला भेटण्याची खूप इच्छा होती...त्यासाठी पत्नी नंदिता पुरी यांच्याशी फोनवरून त्यांचा वाद झाला. मात्र त्यांची मुलाशी अखेर भेट झालीच नाही...' अशी माहिती पुरी यांचे चालक मित्र खालिद किडवई यांनी आज (बुधवार) पोलिसांना सांगितली आहे. 

 

ओम पुरीच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ओशिवरा येथील पुरी यांच्या घरी जेव्हा पोलिस गेले तेव्हा त्यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. 

दरम्यान, पुरी यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे शवविच्छेदन अहवालात (पोस्ट मॉर्टेम) म्हटले असले तरी यामध्ये काही गैरप्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी सुरवातीला फेटाळून लावली होती. मात्र, किडवई यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. 

 

किडवई यांनी सांगितले की, "पुरी यांच्यापासून वेगळ्या झालेल्या पत्नी नंदिता 'त्रिशुल' इमारतीमध्ये राहते. गुरुवारी रात्री ओम पुरी आणि मी त्यांचा मुलगा ईशान याला भेटण्यासाठी तिथे गेलो होतो. मात्र, तो नंदिता यांच्यासोबत एका पार्टीला गेला होता. भेटीसाठी ओम यांचा पत्नीशी फोनवर वाद झाला. नंदिताच्या फ्लॅटमध्ये ओम यांनी ग्लासात दारू ओतून 45 मिनिटे वाट पाहिली, पण ते दोघेही आले नाहीत. मग गाडीत जाऊन त्यांनी दारू प्यायली आणि तिथून आम्ही निघालो."

किडवई यांनी जबाब दिल्यानंतर आता नंदिता पुरी यांनीही त्यांची बाजू मांडली आहे. 

नंदिता यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले की, "पंकज कपूर यांची मुलगी सना आणि पाहवांचा मुलगा मयांक यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आम्हाला खूप लांब जायचे होते. ओम यांनी मला कॉल केला आणि आम्ही कार्यक्रमाला पोचेपर्यंत ते माझ्या घरी पोचले.  तिथे ते माझ्या आईला म्हणाले- 'क्या बुढिया, क्यूँ सड रही है यहाँ. तू भी मेरे साथ स्वर्ग चल.' ते अतिउत्साहात होते. त्यांनी मला पुन्हा कॉल केला आणि म्हणाले- 'तुम और ईशान जल्दी आ जाओ.'  मी त्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला नंतर भेटतो.  त्यांनी काही वेळानंतर पुन्हा कॉल केला तेव्हा मी म्हणाले, 'आता खूप उशीर झालाय. आम्ही तुम्हाला उद्या भेटतो.' त्या दिवशी त्यांना भेटलो नाही याचा ईशान आणि मला अजून पश्चाताप होतोय. ईशान त्यांच्यासोबत 8 ते 10 जानेवारीला 'ट्युबलाईट'च्या शुटिंगसाठी जाणार होता. आणि तिथून ते खंडाळ्याला जाणार होते."

 

नंदिता यांनी पुढे सांगितले की, "आम्ही घटस्फोट घेतला नव्हता, आणि आम्ही अजून कायद्याने विवाहित आहोत. आम्ही फक्त विभक्त झालो होतो. त्रिशुल हे त्यांचे घर आणि माझे सासर आहे. हिंदू कायद्यानुसार एकच पत्नी करण्याची परवानगी असते. एक घटस्फोटित पत्नी आणि एक सध्याची पत्नी असू शकते. ओम यांना एकच पत्नी होती. त्यांनी त्यांच्या पुतण्यांना आणि अपरिचित लोकांनाही मदत केली...पण आता जेव्हा त्यांच्या मुलाला त्यांची गरज आहे तेव्हा ते निघून गेले आहेत. ते म्हणजे माझी सवय बनले होते. माझ्या आयुष्यातील सर्वाधिक काळ मी त्यांच्यासोबत व्यतीत केलाय. माझे आई-वडील आणि मुलगा यांच्यापेक्षाही जास्त काळ. त्यांची मला खूप आठवण येत राहील."

Web Title: om puri's death mystery