esakal | पगलैट - गोष्ट वेडेपणातील शहाणपणाची
sakal

बोलून बातमी शोधा

sanya malhotra

आजच्या जमान्यातील, अत्यंत पुरोगामी विचारांची मुलगी विधवा झाल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार उमेश बिश्त या लेखक दिग्दर्शकानं ‘पगलैट’ या चित्रपटात केला आहे.

पगलैट - गोष्ट वेडेपणातील शहाणपणाची

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

हिंदी सिनेमामध्ये विधवांच्या समस्यांवर अनेक चित्रपट बनवले गेले असतील, मात्र आजच्या जमान्यातील, अत्यंत पुरोगामी विचारांची मुलगी विधवा झाल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार उमेश बिश्त या लेखक दिग्दर्शकानं ‘पगलैट’ या चित्रपटात केला आहे. वेगळी कथा, गंभीर विषय ब्लॅक ह्युमरच्या अंगानं सादर करण्याची हातोटी, संगीत व कलाकारांच्या अभिनयामुळं हा चित्रपट वेगळा ठरतो. मुलगी विचारपूर्वक बोलायला लागल्यास तिला वेडी, ‘पगलैट’ ठरवण्याच्या समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित हा चित्रपट कोरडेही ओढतो.

पगलैटची कथा आहे संध्या गिरी (सान्या मल्होत्रा) या युवतीची. लग्नानंतर केवळ पाचच महिन्यांत तिच्या पतीचं निधन होतं. फेसबुकवरून ‘आयआयपी’चे मेसेजेस स्वीकारणाऱ्या संध्याला या गंभीर प्रसंगामध्ये थोडंही रडू आलेलं नसतं आणि त्यामुळं तिचे सासू-सासरे, आई-वडील चिंतेत असतात. तिच्या या मानसिकतेचा अंदाज घरच्यांना नसतो व ते तेरा दिवसांचा दुखवटा व धार्मिक विधींमध्ये व्यग्र असतात. अंत्यंविधासाठी नाइलाजास्तव तेरा दिवस राहणं आलेल्या नातेवाइकांच्या आपापल्या समस्या असतात व या परिस्थितीवर आपलं मत आणि त्यातून काय फायदा होऊ शकेल, हा स्वार्थही असतो.

हे वाचा - कंगनाने दिली 'पगलैट' ला पसंती ; केले ट्विट

संध्याचे सासरे शिवेंद्र (आशुतोष राणा) व सासू उषा (शिबा चढ्ढा) मुलाच्या मृत्यूनं आर्थिक संकटात सापडतात व त्यातच सुनेच्या जबाबदारीनं खचून जातात. संध्याला पाच महिन्यांच्या संसारात आपल्या पतीनं प्रेमाची वागणूक का दिली नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. ते उत्तर तिला तिच्या पतीच्या ऑफिसमधील सहकारी आकांक्षाकडं (सयानी गुप्ता) असेल, अशी खात्री पटते आणि ती शोध घेऊ लागते. एकीकडं नातेवाइकांची धार्मिक विधी पूर्ण करण्याची गडबड, त्यातून निर्माण होणारे विनोद, हेवेदावे, इस्टेटीचे प्रश्न व त्याच्या जोडीला या तेरा दिवसांत संध्याला लागलेला स्वतःचा शोध अशी समांतर कथानकं सुरू राहतात. या काळात सुशिक्षित संध्याला आपलं ध्येय गवसतं व ती आपल्या ध्येयाच्या दिशेनं प्रवास सुरू करते.

चित्रपटाचं कथानक खूप वेगळं आहे आणि चित्रपटाचा जॉनर शब्दांत सांगणं कठीण आहे. महिलांच्या सबलीकरणाबद्दल सर्वच जण बोलतात, मात्र पुरोगामी आणि प्रतिगामीच्या मध्येच कुठंतरी अडकलेल्या कुटुंबीयांकडं त्यांच्या समस्यांची ठोस उत्तरं नसतात. ते मुलीला अबला ठरवून तिच्या आयुष्याचे सर्व निर्णय स्वतःच घेऊ पाहतात. कथा नेमक्या याच वृत्तीवर हल्ला चढवते. बायको मेल्यावर नवऱ्यानं काहीही केलेलं चालतं, मात्र नवरा मेल्यावर बायकोनं साधं पाणीपुरी खावी वाटली म्हणून बाहेर पडायचं नाही, हा अन्याय संध्याला मान्य नसतो. आजच्या सुशिक्षित मुलींकडून जुन्या काळातील रितीरिवाजांप्रमाणं अपेक्षा ठेवणंही किती चुकीचं आहे, हे अधोरेखित करीत एक नवा विचार देण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. अरजितसिंह याचं संगीत आणि गाणी कथा अधिक टोकदार बनवतात.

हे वाचा - विधानसभेत जे घडलं ते खरं होतं, किस्सा 'थलाइवी' चा

अभिनयाच्या आघाडीवर सान्या मल्होत्राला मोठी संधी आहे आणि संध्याची भूमिका तिनं जबरदस्त साकारली आहे. नवऱ्याच्या मृत्यूमुळं गोंधळलेली, प्रथम बंडखोरी करू पाहणारी व नंतर स्वतःचं ध्येय उमगल्यानंतर त्या दिशेनं प्रवास करणारी संध्या तिनं जिवंत केली आहे. आशुतोष राणा, सयानी गुप्ता, रघुवीर यादव, राजेश तेलंग अशा अनेक कलाकारांनी साकारलेल्या छोट्या भूमिकाही चित्रपटाचं मोठं बलस्थान आहे.

loading image