पाकिस्तानमध्ये 'एम. एस. धोनी'वर बंदी!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. सुशांतसिंह राजपूत यात प्रमुख भूमिकेत आहे.

नवी दिल्ली : उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी येण्याची दाट शक्‍यता आहे. हा चित्रपट भारतामध्ये येत्या शुक्रवारी (30 सप्टेंबर) प्रदर्शित होणार आहे.

उरीतील हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधी भावना तीव्र झाली आहे. पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यास अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये 'एम. एस. धोनी' चित्रपटाच्या वितरणाचे हक्क 'आयएमजीसी ग्लोबल एंटरटेन्मेंट' या कंपनीकडे होते. मात्र, 'सद्यस्थितीतील दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध पाहता हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करू नये,' अशी भूमिका या कंपनीने घेतली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचा 'पिंक' आणि रितेश देशमुख यांचा 'बॅंजो' हे दोन चित्रपट पाकिस्तानमधील थिएटर्समध्ये झळकले आहेत. हिंदी चित्रपटांना दणदणीत प्रतिसाद मिळत असला, तरीही अनेक चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदीही घातली गेली आहे. जॉन अब्राहम-वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'ढिशूम' या चित्रपटावरही पाकिस्तानने बंदी घातली होती.

Web Title: Pakistan set to ban 'M S Dhoni : the untold story'