'कधीही कॉलेजात गेले नाही; 50 हजारांपेक्षा अधिक घेतल्या मुलाखती'        

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

1985 ते 2010 पर्यत सीएनएन च्या सर्वाधिक रेटिंग असणा-या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून ते काम करत होते.

मुंबई - आपल्या आगळया वेगळ्या निवेदन शैलीनं अमेरिकन जनतेला आपलेसे करणारे प्रसिध्द निवेदक लॅरी किंग यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. जगभरातील प्रसिध्द निवेदकांपैकी एक असलेल्या लॅरी यांच्या निवेदनानं निवेदकांची नवी पिढी घडविण्यास मोलाचा हातभार लावला. ते 87 वर्षांचे होते. तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी निवेदकाची भूमिका पार पाडली.

अमेरिकेच्या टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीचे निवेदक म्हणून लॅरी किंग यांची ओळख होती. शनिवारी त्यांचे निधन झाले. अमेरिकेतील प्रमुख निवेदक म्हणून ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांनी राष्ट्रपती यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते केले होते. तसेच त्यांना त्यांच्या कामानिमित्तानं पीबॉडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. ओरा मीडियानं त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर प्रसिध्द केली होती. लॉस एंजेलिस मधल्या सिडर्स सिनाई या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ओरा मीडियाचे ते सह संस्थापक होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाच्या आजारानं संक्रमित होते. त्यासाठी त्यांनी सिडर्स रुग्णालयात दाखल करण्याच आले होते.

लॅरी यांच्याविषयी सांगायचे झाल्यास ते प्रसिध्द शो 'Larry King Live' चे निवेदक होते. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी निवेदकाचे काम केले. तसेच रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या क्षेत्रात 60 वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला. सेलिब्रेटींची मुलाखत, राजकीय चर्चा, सामाजिक प्रश्नांवर घेतलेले परिसंवाद यासाठी अमेरिकी प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्यानं मोठ्या संख्येने अमेरिकन प्रेक्षक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लॅरी हे ब्रुकलिनमध्ये वाढले. विशेष म्हणजे कधीही कॉलेजमध्ये गेले नव्हते. त्यांनी 1950 आणि 60 च्या दशकात फ्लोरिडातील एका स्थानिक रेडिओ केंद्रावर मुलाखतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तसेच स्पोटर्सकार म्हणूनही काही काळ काम केले. 

'गळाभेट घेऊन घ्या रामाचं नाव, गळा दाबून नाही'

1985 ते 2010 पर्यत सीएनएन च्या सर्वाधिक रेटिंग असणा-या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून ते काम करत होते. तो कार्यक्रम होता 'Larry King Live' या नावाचा. त्यांच्या निवेदनानं हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय झाला होता. केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये हा कार्यक्रम लॅरी यांच्या निवेदनासाठी पाहिला जात असे. 2010 मध्ये त्यांनी सीएनएनला रामराम ठोकला. कदाचित विश्वास बसणार नाही पण लॅरी यांनी त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये 50 हजारांपेक्षा अधिक मुलाखती घेतल्या होत्या. 1995 मध्ये त्यांनी पीएलओचे अध्यक्ष यासिर अराफत, जॉर्डनचे राजा हुसैन तसेच इस्राईलचे प्रधानमंत्री यित्साक रॉबिन यांच्यासोबत मध्य पूर्व शांती संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popular American television Larry King legendary talk show host dies at 87