प्रेक्षकांचा विश्‍वासच महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

मराठी मन समृद्ध केले. रंगभूमी दिनानिमित्ताने (ता. ५ नोव्हेंबर)  ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांच्याशी राज काझी यांनी साधलेला संवाद अंशरूपाने....

प्रश्‍न - सभोवतीच्या आर्थिक मंदीच्या आजच्या काळात नाट्य व्यवसायाची परिस्थिती चिंतेचीच आहे काय?
दामले : आज सरसकट नाटक फार चालत नाही, हे खरं जरी असले, तरी चांगल्या नाटकाला प्रेक्षक आहेतच हेही खरं आहे! आपली कलाकृती चांगली असली आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली तर ते चालते, हे साधे गणित आजसुद्धा आहे. परफेक्‍शनच्या जवळ जाणारा प्रॉडक्‍ट आपण कटाक्षाने द्यायला हवा. आशय गुंतवणारा नसेल, सादरीकरण उत्तम नसेल; तर आपण यशाची अपेक्षा कुठल्या बळावर करावी?

आज लोकांच्या चहुबाजूंनी रोजच्या चिंतेशिवाय घरी टीव्ही आहे, तुलनेने स्वस्त सिनेमा आहे. बाहेर पाऊस आहे, रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. एवढे सगळे ओलांडूनदेखील प्रेक्षक तीन-चारशे रुपये मोजून नाटकाला येतो, तेव्हा आपण त्याला उत्तमोत्तम देणे हे आपले व्यावसायिक कर्तव्यच आहे. यात त्याची निराशा झाली, की एकूणच नाटकांबद्दल अविश्वास निर्माण होतो. त्याचा परिणाम बुकिंग रोडावण्यात दिसतो. नाटकांवरचा प्रेक्षकांचा विश्वासच उडू न देण्यासाठी आपण आपल्या नाटकांचा दर्जा जपला पाहिजे. पन्नासाव्या प्रयोगाची सफाई पहिल्याच प्रयोगात आणली पाहिजे. आउटिंग, हॉटेलिंग, शॉपिंग अन्‌ सिनेमे यामध्ये नाटक हा शेवटचा पर्याय झाला असताना त्यांच्या ‘व्हॅल्यू फॉर मनी’च्या चोख अपेक्षेत नाटक बसले, तर नक्कीच लोक येतील. त्यांचा विश्वासदेखील वाढीस लागेल. हे आज व्यावसायिक नाटकाला साधावेच लागेल.

प्रश्‍न - बदलत्या काळात काही गणितेही बदलतात का?
दामले :
गणित नाही बदलत, विषय बदलतात नाटकांचे. नाटक रंगवण्याचे गणित नाटकागणिक बदलते! प्रयोगात नाटक प्रेक्षकांपर्यंत उत्तम पोहोचवणे हे महत्त्वाचे. प्रेक्षागृहाबाहेरही ते लोकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचवणे, ही मात्र आजची मोठी गरज आहे. ज्या प्रकारचे नाटक आहे, त्याप्रमाणे त्यासाठीच्या प्रोजेक्‍शनचा विचार करावा लागेल. सोशल मीडियाचाही योग्य वापर त्यासाठी केला पाहिजे. नाटकांच्या आकर्षक जाहिरातींचा, अनुकूल परीक्षणांचा उपयोग होतोच; पण सगळ्यात महत्त्वाची आहे ती माउथ पब्लिसिटी! म्हणून आलेल्या रसिकाला पूर्ण संतुष्ट करणे, हे सार्वकालिक गणितच शेवटी महत्त्वाचे!
 
प्रश्‍न - हे गणित कसे जुळवत आला आहात तुम्ही सातत्याने?
दामले :
सातत्यच महत्त्वाचे असते, आपल्या परफॉर्मन्समधले! आजच्या प्रयोगाइतकाच उद्याचा प्रयोगही चांगलाच रंगावा हेच सातत्य. उलट तो त्याहीपेक्षा जास्त चांगला कसा होईल, हे पाहणे हे एन्हॅन्सिंग, ही एक निरंतर प्रक्रिया आहे. जाणवू लागलेल्या त्रुटी झाकून कशा घेता येतील, नव्हे नंतर तिथली गंमतच कशी घेता येईल, हे विशेषत- विनोदी नाटकात पाहावेच लागते.
अशा वेळी मग काही ऑडिशन्स घ्याव्या लागणार असतील तर ती लेखकाचीच वाक्‍ये वाटावीत, याची मी स्वत- काळजी घेतो. नाटकाच्या ओघात अन्‌ आशयात ती एकजीव व्हावीत हे पाहतोच.

प्रश्‍न - हे एक अभिनेता म्हणून झाले... निर्मात्याच्या भूमिकेतही अशी काळजी घ्यावी लागते काय?
दामले :
निश्‍चितच, किंबहुना जास्तच! निर्मितीत खूपच चिवटपणे काम करावे लागते. संहितेपासूनच हे सुरू होते, स्क्रिप्ट जास्तीत जास्त निर्दोष आणि रंगतदार कसे होईल, यासाठी आधी नेटाने बसावे लागते. एकेका नाटकाच्या लेखनावर दोन-दोन वर्षे प्रक्रिया घडत राहते. निरनिराळ्या शक्‍यता आणि वळणांचा विचार करीत नाटक पुढे जात राहते. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा शेवटी प्रेक्षकांसमोर आलेला हा सातवा-आठवा ड्राफ्ट आहे. यात निर्मात्याने लेखकाला सतत पाठबळ देणे महत्त्वाचे. पुढे तालमीत दिग्दर्शकाच्या नवनव्या कल्पना आणि कलाकारांनी दिलेल्या फोडण्या असतातच!

तालमीतच नाटक घट्ट बांधले जावे. ऑफलाइन तालीम अन्‌ ऑनलाइन प्रयोग इतकेच ते उरावे. कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत उत्तम टीम उभी करणे, ती एकसंध आणि सुखी ठेवणे, हेही निर्मात्याचेच काम!

प्रश्‍न - सहकारी निर्मात्यांसाठी काही सल्ला?
दामले : सल्ला म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या हिताचे एक सांगणे - नाटकांची वाढती संख्या आवरायला हवी. प्रेक्षकांसमोर गरजेपेक्षा खूपच पर्याय येत राहिले, तर त्यांचा गोंधळ वाढतो आणि पर्यायाने काहीच निवडले जात नाही. त्यापेक्षा तीन-चार निर्मात्यांनी एकत्र येत निर्मिती केली, तर आपण निर्मितीचे बजेट वाढवू शकू, निर्मितीमूल्ये दर्जेदार श्रीमंत ठेवू शकू. प्रयोगांचे सातत्य राखू शकू आणि त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकू! प्रेक्षकांचा विश्‍वासही अभंग राहील, प्रेम वाढते राहील. प्रेक्षकांच्या विश्वासाला प्रेमाचीही जोड मिळेल अशी नाटके यायला हवीतच! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Damle Exclusive Interview

टॅग्स