'खाता रहे मेरा दिल'चे नाव बदलून 'आज काय स्पेशल!'

टीम ई सकाळ
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

प्रशांत दामले आता कलर्स मराठीवरच्या नव्या शोमध्ये येणार आहेत. या शोचं नाव आधी खाता रहे मेरा दिल असं होतं. आता ते बदलून आज काय स्पेशल असं करण्यात आलं आहे. या शोचं प्रमोशन आता सुरू झालं असून, हा शो 25 आॅगस्टपासून सुरू होणार आहे. 

मुंबई : ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात हे योग्यचं आहे. नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी अन्नावर प्रेम असावे लागते तरच त्या पदार्थांवर न्याय होतो. बऱ्याच लोकांना खाण्याची आवड नसून दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे कि वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी अश्याच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम घेऊन येत आहे, “आज काय स्पेशल” २५ ऑगस्टपासून सोम ते शुक्र दुपारी १.३० वा. एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी सर्जनशीलता आणि मेहेनतीची गरज असते तसेच प्रेक्षकांना आपलसं करण्यासाठी देखील या दोन्ही गोष्टींची सांगड असणे खूप महत्वाचे असते. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला देखील या दोन्हींची उत्तम सांगड असलेले, आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी माणसाशी अतूट नातं जोडलेले तसेच ज्यांना उत्तम चवीची जाण आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांच प्रतिनिधीत्व करणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका ‘पर्पल पॅच मिडीयाज’ (प्रशांत नाईक आणि समीर जोशी) निर्मित “आज काय स्पेशल” तुमच्या लाडक्या प्रशांत दामलेंसोबत फक्त कलर्स मराठीवर. 
 
एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे म्हणतात. हा कार्यक्रम बघून तुम्ही देखील तुमच्या जवळच्या माणसांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांची मने जिंकू शकता. या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना रुचकर आणि चविष्ट पदार्थ एका नव्या रुपात, नव्या पद्धतीने शिकण्याची वा प्रेक्षकांना दाखविण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये विविध प्रांतातील पाककृती बघायला मिळणार आहे एका नव्या अंदाजमध्ये. आपण आजवर अनेक पदार्थ खात आलो पण याच पदार्थांना नवीन पद्धतीने कसे करावे, कशी त्यांची चव वा तो पदार्थ रुचकर करावा, कसे त्यांना खुशखुशीत पद्धतीने सादर करावे हे कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
 
या मालिकेच्या निमित्ताने कलर्स मराठी प्रमुख, व्हायाकॉम -18 चे निखील साने म्हणाले, “रंगमंच, सिनेमा, टेलिव्हिजन या माध्यमांमध्ये सशक्त भूमिका करणारा, एक चांगला मित्र तसेच कलाकार आणि खवय्या म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत दामले यांना आम्ही घेऊन येत आहोत आमच्या “आज काय स्पेशल” या नव्या कार्यक्रमामध्ये. मी प्रशांत बरोबर गेली बरीच वर्षे काम करत आहे तो चवीचं खाणारा, हसत हसत आपल्यासोबत जगणं शिकवणारा,एक उत्तम, दर्जेदार कलाकार आहे. प्रशांत कार्यक्रमात असणे म्हणजेच प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी देणे. प्रशांत मधील महत्वाचा गुण, तो खूप निवडक कामं करतो, आणि जी करतो ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. प्रशांत दामले घेऊन येत असलेला आमचा हा नवा, फ्रेश, लज्जतदार कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकेल अशी मला खात्री आहे”.
 
या कार्यक्रमाबद्दल प्रशांत दामले म्हणाले, “श्वास घेणं जितक महत्वाचं आहे तितकचं महत्वाच खाण देखील आहे, आयुष्यातील ही एक अविभाज्य गोष्ट आहे असे मी म्हणेन. प्रत्येक माणूस त्या त्या वयाप्रमाणे खात असतो, वेगवेगळ्या पद्धतीच खात असतो तिखट, गोड. वयोपरत्वे त्याच्या खाण्याच्या पद्धती देखील बदलत असतात, पण म्हणून खाण कधीच व्यर्ज होत नाही. कुठल्याही वयात जितक्या पद्धतीच खाता येईल तितका जीवनाचा प्रवास सुखकर होतो. हा जो घटक आहे याश्याचीच संबंधीत हा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी हा कार्यक्रम करत आहे”.  
 
“आज काय स्पेशल” या कार्यक्रमामध्ये भारतीय पारंपारिक पदार्थ जे आपल्या आवडीचे आहेत त्यांना नवा साज मिळणार आहे हे नक्की. कार्यक्रमाच्या सेटचा लुक फ्रेश ठेवण्यात आला आहे. कार्यक्रम रुचकर तर असेलच यात काही शंका नाही पण तो खमंग पद्धतीने डिजाईन करण्यात आला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बाप्पाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम सुरु होणार आहे तसेच प्रशांत दामले कलर्स मराठी सोबत आपुलकीच्या नव्या नात्याची सुरुवात या कार्यक्रमाद्वारे करणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका “आज काय स्पेशल” २५ ऑगस्टपासून सोम ते शुक्र दुपारी १.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Web Title: prashant damle featuring new show on colors marathi esakal news