'पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेळ नाही का?'; विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं रोखठोक उत्तर | Prashant Damle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare, Prashant Damle

'पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेळ नाही का?'; विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं रोखठोक उत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare यांचं सोमवारी पहाटे पुण्यात निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांपासून ते अनेक मंत्री, राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेते प्रशांत दामले Prashant Damle यांनी त्याच दिवशी त्यांच्या नाटकाच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली. विविध क्षेत्रांतून पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली जात असताना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्हाला वेळ नाही मिळाला का, असा प्रश्न एका नेटकऱ्याने त्यांना केला. या प्रश्नावर प्रशांत दामलेंनी दिलेल्या उत्तराची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

'एका लग्नाची पुढची गोष्ट, आज रात्र कोल्हापूर उद्या कऱ्हाड परवा सांगली, निघालोय मुंबईहून', अशी पोस्ट प्रशांत दामलेंनी फेसबुकवर लिहिली होती. त्यावर एका नेटकऱ्याने त्यांना सवाल केला, 'बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं आहे, श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्हाला वेळ नाही का?' नेटकऱ्याच्या या प्रश्नावर प्रशांत दामलेंनी उत्तर दिलं, 'सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली तरच एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो असं काही नाही. बाबासाहेब आम्हा कलाकारांच्या हृदयात आहेत आणि राहतील. त्याचा गाजावाजा का करायचा?' प्रशांत दामले यांच्या या उत्तराला हजारो लाईक्स मिळाले आहेत. प्रशांत दामले यांनी याआधीही सोशल मीडियाद्वारे अशा पद्धतीने नेटकऱ्यांना कधी गमतीने तर कधी परखडपणे उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: 'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

बाबासाहेब पुरंदरे हे ९९ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून शिवछत्रपतींचा पराक्रम, महाराष्ट्राचा इतिहास आणि इथल्या उत्तुंग सांस्कृतिक परंपरेवर संशोधनास प्रारंभ केला. त्यांच्या निधनामुळे शिवआख्यान शांतावलं.

loading image
go to top