गोरेपणा म्हणजेच सौंदर्य? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

अभयने वंशभेद, वर्णभेदासारख्या विषयाला सोशल मीडियाचा वापर करत वाचा फोडली आहे. पण खरा मुद्दा आहे तो हा, की पुढे काय? काही दिवसांनंतर हवेतच हा मुद्दा विरेल? की यातून काही चांगले निष्पन्न होईल? 

 

मनोरंजन क्षेत्रातली व्यक्ती एखाद्या सामाजिक मुद्द्यावर बोलू लागली, की वाटतं की नक्की त्यांचा कुठला तरी नवा सिनेमा येत असणार. पण, अभय देओल बोललाय ते मात्र केवळ प्रसिद्धीसाठी नक्कीच नाही. 

अभयने फेसबुकवरून लागोपाठ तब्बल 13 पोस्ट केल्यात. त्या आहेत रंगाविषयी. त्वचेच्या रंगाविषयी. नेटकरांनी त्याचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. निवडक सिनेमा करणारा अभय देओल एकाएकी वर्णभेदासारख्या विषयावर का बोलू लागला, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीय.

सध्या अभय दिल्लीमध्ये "द फिल्ड' नावाच्या सिनेमाचं शूटिंग करतोय. हा एक आंतरराष्ट्रीय सिनेमा बनणार असल्याचं बोललं जातंय; पण हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून वेळ आहे. सध्या तरी त्याच्या पोस्टवरून एका सामाजिक विषयाला तो भिडलाय हेच दिसतंय. त्यानं 13 पोस्ट करताना जॉन अब्राहम, इलियाना डिक्रुज, दीपिका पदुकोन, शाहीद कपूर, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहरूख खान, विद्या बालन अशा बॉलीवूड नायक-नायिकांना लक्ष्य केलंय. त्यांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीतील फोटो पोस्ट करून, त्यावर असं म्हटलंय की त्यांनी जाहिरातीत काम करून एक प्रकारे वर्णभेदालाच प्रोत्साहन दिलं आहे.

त्याचबरोबर त्यानं हेही दाखवून दिलंय की काही बॉलीवूडकरांनी मात्र सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींना नाकारलंही आहे. रणदीप हुडा, कंगना राणावत, रणबीर कपूर, नंदिता दास, स्वरा भास्कर यांनी अशा जाहिरातींना नकार दिल्याचं त्यानं म्हटलंय. 

याला फारस कुणीही उत्तर दिलं नव्हतं; पण सोनम कपूरनं ईशा देओलचा अशा जाहिरातीमधला फोटो ट्विटरवर पोस्ट करून "याविषयी काय म्हणशील, अभय' असं विचारलंय. पण, नेटकरांनी तिलाच ट्रॉल केल्यावर तिनं ती पोस्ट डिलीट करून टाकली. 

 

Web Title: racial discrimination abhay deol