रईस मनाचा दिग्दर्शक 

संतोष भिंगार्डे 
मंगळवार, 24 जानेवारी 2017

दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्याशी त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाविषयी मारलेल्या गप्पा- 

दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्याशी त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाविषयी मारलेल्या गप्पा- 

रईस चित्रपटाची ही भन्नाट कथा कशी काय सुचली? 
- "लमहा' चित्रपट केल्यानंतर मी अमेरिकेत होतो. तिथेही माझे काही मित्र आहेत. त्यांचे लीकरचे स्टोअर्स आहेत. त्यांना ती लिकर प्रमोट करण्यासाठी भारतातून फंड आला. मग त्यांनी मला या विषयावर एखादा चित्रपट बनू शकतो का, असं विचारलं. कारण त्यांना चित्रपटाद्वारे ती लिकर प्रमोट करायची होती. त्यानंतर मी विचार करू लागलो आणि मला ही कथा सुचली. सुरुवातीला आम्ही या चित्रपटाचं नाव "रईस' असं न ठेवता "कारोबार' असं ठेवलं होतं. हे नाव आम्ही रजिस्टर्डही केलं होतं. पण त्यानंतर आम्हीच ते नाव न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि "रईस' हे नाव निश्‍चित केलं. 

शाहरूखऐवजी दुसऱ्या कुणा ऍक्‍टरला घ्यायचा विचार होता की शाहरूखलाच घ्यायचं होतं? 
-  शाहरूखचं नाव सुरुवातीला आमच्या डोक्‍यातच नव्हतं. आम्ही ही कथा फरहानला ऐकवली होती. तेव्हा तो "शादी के स्पेशल इफेक्‍टस्‌' या फिल्ममध्ये बिझी होता. त्याला ही कथा आवडली आणि त्याने निर्माता बनणं पसंत केलं. मग माझी आणि रितेश सिधवानीची चर्चा सुरू झाली आणि सर्वसंमतीने शाहरूखचं नाव फायनल झालं. आम्ही शाहरूखला भेटलो आणि त्याला ही कथा ऐकवली. त्याला ही कथा आवडली खरी; पण लगेच त्याने आम्हाला प्रश्न केला, की माझीच निवड या भूमिकेसाठी तुम्ही का करता आहात? मी त्याला सांगितलं, या चित्रपटात एक संवाद आहे आणि तो तुमच्या तोंडूनच ऐकायला आम्हाला आवडेल. एकूणच या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर तो तयार झाला. त्याचा होकार मिळताच मलाही आनंद झाला. कारण एका मोठ्या स्टारबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. 

शाहरूखसारख्या बिग स्टारबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? 
- रईसची टीम छान तयार झाली होती आणि मला माझ्या टीमची चांगली साथ होती. तसंच निर्माते माझ्या मागे खंबीरपणे उभे होते. शाहरूखने चांगलं सहकार्य केलं. आम्ही खेळीमेळीने काम केलं. कधी तो मला काही सांगत होता; तर कधी मी त्याला सूचना करीत होतो. प्रत्येक दिवशी चित्रीकरणाला सुरुवात झाली की शाहरूख मला याअगोदर कुठला सीन केला? असं विचारायचा आणि मग सीन शूट करायला तयार व्हायचा. सीन्सचा सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आणि काम करायचा. मला वाटतं, की असे काही मोजकेच कलाकार आहेत, जे वारंवार दिग्दर्शकाशी चर्चा करतात आणि मग काम करतात. 

अभिनेत्री माहिरा खानच्या निवडीमागे काही खास कारण होतं का? 
- आम्हाला अमेरिका किंवा कॅनडाची नायिका नको होती. तीस वर्षांची दिसणारी आणि मुस्लिम बॅकग्राऊंड असणारी नायिका हवी होती. मात्र तिची हिंदी भाषाही अस्खलित असणं तितकंच आवश्‍यक होतं. माहिराला मी एका टीव्ही शोमध्ये पाहिलं आणि तेव्हाच तिला घेण्याचं निश्‍चित केलं. त्याकरिता तिची रीतसर ऑडिशन घेतली. ती त्या भूमिकेत चपखल बसली तेव्हाच तिची निवड करण्यात आली. 

"रईस' चित्रपट शूट करण्यासाठी खूप वेळ लागला, अशी चर्चा होती. असं का झालं? 
- या चित्रपटात ऍक्‍शन भरपूर आहे आणि शाहरूखने पहिल्यांदाच अशा प्रकारची ऍक्‍शन केलीय. शाहरूखच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे तो ऍक्‍शन सीन्स काही महिने देऊ शकत नव्हता. यातील "उडी उडी जाय' गाण्याच्या वेळीही त्याची औषधं सुरू होती. तरीही त्याने ते गाणं पूर्ण केलं. शाहरूख हा मेहनती कलाकार आहे. काम करत असताना मला तो कधीच थकलेला दिसला नाही. आपलं काम अधिकाधिक चांगलं कसं होईल याकडे तो लक्ष देत असतो. 

शाहरूख आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या दोन्ही कलाकारांना सेटवर कसं काय सांभाळून घेतलं? 
- ते दोघेही हुशार आणि मेहनती आहेत. दोघांनीही एकत्रित रिहर्सल केली. नवाजुद्दीन या चित्रपटात पोलिस अधिकारी बनलाय. दोघांनीही चांगला परफॉर्मन्स दिलाय. 

प्रेक्षकांकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? 
- माझी एवढीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा. आम्ही हा चित्रपट सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून बनवलाय. त्यामुळे तो जास्तीत जास्त प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. शाहरूखचे खूप फॅन्स आहेत. मला खात्री आहे की ते त्याला नाराज करणार नाहीत. 

"रईस'बरोबरच "काबील' चित्रपट रिलीज होतोय. या दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा तर नाही ना? 
- मी कधीच कुणाशी स्पर्धा करत नाही. मी माझं काम चोख आणि प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे स्पर्धा आहे वगैरे मला वाटत नाही. 

 

Web Title: Raees Director