Rakshabandhan Review: 'रक्षाबंधन' पाहायला जातायं सोबत 'रुमाल' हवाच! |Raksha Bandhan Movie Review director Anand l rai Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakshabandhan Review

Rakshabandhan Review: 'रक्षाबंधन' पाहायला जातायं सोबत रुमाल हवाच!

Raksha Bandhan Movie Review: भलेही अक्षय गेल्या काही वर्षांपासून कॉमेडी जॉनरमध्ये काम करत असेल मात्र त्याच्या काही कलाकृतींनी प्रभावी कामगिरी केली आहे. रुस्तुमध्ये तो प्रेक्षकांना भावला होता. बेलबॉटममध्ये त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. यासगळ्यात त्याच्या लक्ष्मी बॉम्बनं मात्र निराशा (Bollywood movies) केली होती. तिच गत बच्चन पांडेच्या बाबत सांगता येईल. अक्षयनं दुसऱ्यांदा आनंद एल राय यांच्यासोबत काम करुन आपली इमेज पुन्हा (bollywood actor akshay kumar) एकदा लाईमलाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी त्यानं त्यांच्या अतरंगीमध्ये काम केलं होतं. बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप झाला पण आनंद एल राय यांच्या चाहत्यांना तो कमालीचा आवडला होता. तनु वेड्स मनु पासून आनंद एल राय यांनी आपला वेगळा ठसा उमटविण्यास जी सुरुवात केली ती पुढे क्वीन, रांझणा यांच्यापर्यत जोरदारपणे सुरुच आहे.

आनंद राय यांच्या रक्षाबंधनवर सोशल मीडियातून भलेही कितीही टीका झाली असेल मात्र हा चित्रपट तुम्हाला काही गोष्टींबाबत खडबडून जागं केल्याशिवाय राहत नाही. तो प्रत्येकवेळी रडवतो. चित्रपटात हसण्याच्या प्रसंगापेक्षा रडवण्याचे प्रसंग अधिक आहेत. त्यामुळे 110 मिनिटांच्या या चित्रपटात किमान चार ते पाचवेळा हमखास डोळ्यातून पाणी येते. प्रेक्षकांना कमालीचं भावनाशील करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे अक्षयची यातील भूमिका प्रेक्षकांना भावणारी आहे. त्यानं नेहमीप्रमाणे ओव्हरअॅक्टिंग न करता जमेल तेवढी साधी भूमिका करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. कदाचित आनंद राय यांच्या अतरंगीमध्ये त्याला फारसा वाव न मिळाल्यानं अक्षयनं ती कमी रक्षाबंधनच्या माध्यमातून भरुन काढली आहे.

दिल्लीतील चांदणी चौकातून चित्रपट सुरु होतो. आणि संपतो देखील त्याच चौकात. मात्र त्या चौकातील प्रवास हा आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. लाला केदारनाथ ( अक्षय कुमार) ज्यांच पिढीजात पाणीपुरी विक्रीचं मोठं दुकान आहे. त्याच्या दुकानात जी प्रेग्नंट महिला पाणीपुरी खाणार तिला हमखास मुलगाच होणार अशी त्या दुकानाची खासियत आहे. दिग्दर्शकाचा त्यामागील विचार किती व्यापक आहे हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईलच. त्यातून त्याला अखिल पुरुष जातीवर जी प्रतिक्रिया द्यायची आहे त्यानं ती मोठ्या खुबीनं प्रतिकात्मक पद्धतीनं दिली आहे.

Rakshabandhan Review

Rakshabandhan Review

लाला केदारनाथला चार बहिणी. अख्ख्या चांदणी चौकात त्यांच्या पराक्रमाविषयीची चर्चा आहे. त्या किती खोडकर आहेत. त्यांनी भावाच्या लालाच्या नाकी किती नऊ आणले आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र भावाला त्यांच्या लग्नाची चिंता आहे. काही झालं तरी बहिणींचे लग्न झाल्याशिवाय तो स्वत लग्न करणार नाही. असं वचन त्यानं आईला दिलं आहे. त्यामुळे लहानपणापासून त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या सपनाच्या (भूमी पेडणेकर) वाट्याला प्रतिक्षाच आहे. तिचे वडील लालाला चांगलेच वैतागले आहे. लाला बहिणींचे लग्न करत नाही. आणि सपनाशीही लग्नाला तयार होत नाही. यामुळे त्यांची चिडचिड वाढली आहे.

Rakshabandhan Review

Rakshabandhan Review

लालाच्या मोठ्या बहिणीचे लग्न एका मोठ्या घरात होते. भावाच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहतात. बाकीच्या बहिणींचे लग्नही लवकरच होईल असं त्याला वाटतं. मात्र एवढं सगळं झालं असतं तर सगळं सोपं होतं. मात्र तसं न होता जे घडतं त्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसतो. लालाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानं त्या गोष्टीचा कधीही विचारही केलेला नसतो. पण जे आलं त्याला समोर जाण्याचं धाडस त्याच्यात यायला बराच वेळ जातो. न खचता तो उभं राहतो आणि आपल्यासमोर काही प्रश्न उभे करतो...

लालाचे प्रश्न काय आहेत, त्याच्यावर असं कोणतं संकट येत की त्यामुळे तो खचतो, कोणती गोष्ट त्याच्या मनाला सर्वाधिक लागते, त्याचं आणि सपनाचं लग्न होतं का, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला रक्षाबंधन नक्की पाहावा लागेल. रक्षाबंधन निव्वळ मनोरंजन नाही तर त्याच्यापलीकडे खूप काही सांगणारी कलाकृती आहे. आजही लग्नासाठी हुंडा घेणाऱ्या लोकांवर त्यात कडाडून टीका करण्यात आली आहे. भारतात दररोज हुंडाबळींची संख्या वाढते आहे. दिग्दर्शकांनं त्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधले आहे. त्याविषयाला प्रभावीपणे आपल्यासमोर सादर केले आहे.

हेही वाचा: Darling Review: 'दैवं देतं कर्म नेतं' सांगणारा 'डार्लिंग', आलियाची कमाल!

रक्षाबंधनमधील अक्षय कुमार वेगळा आहे. त्याचा अभिनय आपल्याला भावतो. भूमीनं देखील आपली वेगळी छाप उमटविली आहे. याशिवाय चार बहिणींच्या भूमिकेतील सादिया खतीब , सहेजमीन कौर , स्मृति श्रीकांत आणि दीपिका खन्ना यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पूर्वाधात वेगानं रक्षाबंधन आपल्यासमोर येतो. मध्यंतरानंतर त्याचा वेग तुलनेनं कमी आहे. त्यामुळे तो थोडासा रटाळ झाला आहे. हिमेश रेशमियाच्या गाण्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. मात्र दर दहा ते पंधरा मिनिटांनी येणाऱ्या गाण्यांनी उबग येतो. टिपिकल फॅमिली फिल्म पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी रक्षाबंधन बेस्ट ऑप्शन आहे. दुसरीकडे लाल सिंग चढ्ढाला न जाऊ इच्छिणाऱ्यांना रक्षाबंधन नाराज करणार नाही. एवढं मात्र नक्की.....

हेही वाचा: Laal Singh Chaddha Review: निव्वळ 'डब्बा'! IMDB कडून 10 पैकी फक्त 4 रेटिंग