भूमिकेत रंगून जाते... 

संतोष भिंगार्डे 
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत हिच्याशी तिच्या नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या "रंगून' सिनेमाच्या निमित्ताने चिटचॅट... 

बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत हिच्याशी तिच्या नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या "रंगून' सिनेमाच्या निमित्ताने चिटचॅट... 

हिमाचल प्रदेशातील एक मुलगी बॉलीवूडमध्ये येते काय आणि स्टारडम तिला मिळते काय... हा एक चमत्कार आहे, तुलाही असं वाटतं का? 
- मी हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून इथे आले. माझ्या घरच्या मंडळींना मी डॉक्‍टर व्हावं असं वाटत होतं. परंतु माझ्या नशिबात लाईट, ऍक्‍शन आणि कॅमेराच लिहिलेला होता. त्यानुसार मी या इंडस्ट्रीत आले. मुळात चित्रपटांची मला खूपच आवड होती. दिल्लीत थिएटर करीत असतानाच मला "गॅंगस्टर' हा चित्रपट मिळाला. तो काही फारसा चालला नाही. पण मी निराश झाले नाही. माझे प्रयत्न आणि संघर्ष सुरूच ठेवला. त्यानंतर मधुर भांडारकरचा "फॅशन' हा चित्रपट मिळाला. त्या चित्रपटात माझा छोटासा रोल होता. परंतु प्रेक्षकांना तो खूपच आवडला. माझ्या कामाचं कौतुक झालं आणि थेट राष्ट्रीय पुरस्कारावर माझं नाव कोरलं गेलं. परंतु "क्वीन' या चित्रपटामुळेच माझ्या करिअरला खरी कलाटणी मिळाली. मग मला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट तो चित्रपट ठरला. 

मग आता सुरुवातीची कंगना आणि आताची कंगना कशी आहे? 
- माझ्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही. मात्र या इंडस्ट्रीकडून बरंच काही शिकले आहे आणि आजही मी शिकत आहे. मला काम मिळविण्यासाठी संघर्ष खूप करावा लागला. माझा इथे कुणी गॉडफादर नसताना प्रचंड मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविलं आहे. काही वाईट अनुभव आले असले, तरी आज मी ज्या टप्प्यावर आहे तिथे आनंदी आहे. विविध प्रकारचे चित्रपट...त्यातील वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला येत आहेत. आता तर मला खूप चांगल्या ऑफर्स येताहेत. त्यातील काही चित्रपट स्त्री-प्रधान असतात खरे; परंतु त्यामध्ये म्हणावा तसा दम नसतो. त्यामुळे मी काम करण्यास नकार देते. परंतु एक गोष्ट निश्‍चित की "क्वीन' चित्रपटामुळे मला स्टेट्‌स मिळालं. 

2016 हे वर्ष तुझ्या दृष्टीने कसं काय होतं आणि आता तुझा "रंगून' चित्रपट येतोय...त्याबद्दल काय सांगशील? 
- मागील वर्ष माझ्यासाठी विविध घडामोडींचं ठरलं. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचा मला खूप आनंद झाला. परंतु माझ्या वैयक्तिक जीवनात काही कठीण प्रसंगांना मला सामोरं जावं लागलं. मी इंडस्ट्रीच्या बाहेरची असल्यामुळे काही मंडळींनी दादागिरी केली. त्यांना मी चोख उत्तर दिलं असलं, तरी त्या गोष्टींचा मला खूप मनस्ताप झाला. आता त्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. कदाचित माझी ती वेळ खराब होती. परंतु हे वर्ष माझ्यासाठी अगदी खास असणार आहे. माझा "रंगून' चित्रपट आता प्रदर्शित होतोय. प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या ट्रेलरचं चांगलं स्वागत केलंय. त्यामुळे चित्रपटाला चांगलं यश मिळेल याची मला खात्री आहे. या वर्षी कोणताही वादविवाद होऊ नये अशी इच्छा आहे. 

"रंगून'मध्ये तू साकारत असलेली ज्युलियाची भूमिका तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होती? 
- ही व्यक्तिरेखा संपूर्णतः काल्पनिक आहे आणि ती साकारणं माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच होतं. ही एक पीरियड फिल्म आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची पार्श्‍वभूमी या चित्रपटात असली तरी त्यामध्ये प्रेमकहाणी गुंफण्यात आली आहे. विशाल भारद्वाज यांचे चित्रपट काहीसे वेगळे असतात. त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये ही कहाणी मांडलेली आहे. ज्युलिया त्या जमान्यातील सुपरस्टार असते. म्हणजे ती त्या काळातील नायिका आहे. ती हुशार आणि स्वच्छंदी आहे. तिचं दोघांवर प्रेम असतं. सैफ अली खान या चित्रपटात निर्मात्याची भूमिका साकारीत आहे आणि शाहीद कपूर नवाज मलिकची भूमिका साकारीत आहे. 

या भूमिकेच्या तयारीसाठी तू अमेरिका-लंडन वगैरे ठिकाणी गेली होतीस असं ऐकलंय... 
- हो...या चित्रपटात डान्स आहे आणि डान्सचे विविध प्रकार शिकण्यासाठी मी तिथे गेले होते. त्या काळातील डान्सचा फॉर्म... इंग्रजी चालीरिती जाणण्यासाठी मी तिकडे जाऊन आले. याकरिता बॅले डान्सही मला शिकावा लागला. खरं तर ज्युलिया पहिल्यांदा ज्वाला देवी या नावाने ओळखली जात होती. त्यानंतर इंग्रजी वातावरणामध्ये ती अधिक राहिल्याने तिचं नाव ज्युलिया असं झालं. त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं. देशाची स्थिती वेगळी होती. कुणी इंग्रज सरकारला मिळालेले होते; तर कुणी विरोध करीत होते. या भूमिकेसाठी मला लूकवरदेखील बरीच मेहनत घ्यावी लागली. 

चित्रपटाचं नाव रंगून असं का ठेवण्यात आलं. ते ज्युलिया असं का नाही? 
- मला असं वाटतं, की रंगून हे शीर्षकच योग्य आहे. हा चित्रपट केवळ ज्युलियाच्या भोवतीच फिरणारा आहे असं काही नाही. तर सैफ अली खान आणि शाहीद कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. रंगून हे शहर आहे आणि त्या शहरात ही कथा घडते. ज्युलियाला रंगूनमध्ये पाठवलं जातं. त्यानंतर अनेक घडामोडी या चित्रपटात घडतात. 

तुझ्या मते ऍक्‍टिंगची व्याख्या काय आहे? 
- ऍक्‍टिंग करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आणि त्याप्रमाणे तो कलाकार काम करीत असतो. मी कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव, त्यांचं बोलणं आणि चालणं तसंच त्यांचे हावभाव यांचं बारीक निरीक्षण करते आणि मगच ती व्यक्तिरेखा पडद्यावर साकारते. खरं तर प्रत्येक भूमिकेची तयारी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. त्यासाठी तुमची निरीक्षणशक्ती दांडगी असायला हवी. तसंच वाचनही आवश्‍यक आहे. थोडक्‍यात भूमिकेत मी रंगून जाते. 

आणखीन दहा वर्षांनी चित्रपटसृष्टी कोणत्या टप्प्यावर असेल असं तुला वाटतं? 
- सध्या चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होतायेत. "नीरजा', "एअरलिफ्ट', "पिंक' यांसारखे चित्रपट येत आहेत. महिलाप्रधान आणि वास्तववादी चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे एकूणच हा बदल मला सकारात्मक वाटतोय. आगामी दहा वर्षांत चित्रपटसृष्टीचं रुपडं आणखीन बदललेलं दिसेल. आपला सिनेमा अधिक विकसित झालेला असेल. 

Web Title: rangoon movie kangana character ''rangoon