Mardani 2 : राणी मुखर्जी म्हणते मुलींनो स्वतःचे संरक्षण करायला शिका!

rani-mukherjee
rani-mukherjee

माझ्या करिअरला सुरुवात नव्वदीच्या दशकात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर मला ‘गुलाम’ चित्रपटासाठी बरीच वाहवा मिळली. ‘हॅलो ब्रदर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘साथियाँ’, ‘ब्लॅक’सारखे अनेक चित्रपट मी केले. आता मी ‘मर्दानी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘मर्दानी’मध्ये मी क्राइम ब्रॅंच ऑफिसरची भूमिका साकारली होती; तर ‘मर्दानी २’मध्ये मी उपनिरीक्षकाच्या भूमिकेत आहे. उपनिरीक्षकांना नेहमीच त्यांच्या वर्दीत राहावे लागते. क्राइम ब्रॅंच ऑफिसर मात्र गुन्हेगाराला गुप्तहेराप्रमाणे पकडतात.

उपनिरीक्षकांना गुन्हेगारांना समोर जाऊन पकडावे लागते. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे ‘मर्दानी २’मध्ये उपनिरीक्षकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठी जबाबदारीच होती. चित्रपटात बरेचदा मी खाकी वर्दीत दिसले आहे; त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. या चित्रपटात मी बरेच फाईट सीन्सही केले आहेत. बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण मी घेतले होते.

चित्रपटामध्ये मी एका व्यक्तीला अगदी रागाने मारत असल्याचा प्रसंग आहे. एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचा राग व्यक्‍त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा तिच्यात ज्या प्रकारची एनर्जी येते, तशीच त्या वेळी ती माझ्यातही आपोआपच आलेली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी पुथरन आणि माझी ओळख ‘मर्दानी’पासूनच आहे.

त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मी राजस्थानमधील कोटा शहरात केले आहे. तेथील ४० ते ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने मला कोटामधील राहणीमान आणि तेथील लोकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. ‘मर्दानी’नंतर २०१४मध्ये माझे लग्न झाले, मला मुलगी झाली. त्यामुळे चित्रपटांपासून मी थोडा गॅप घेतला होता. माझी मुलगी दीड वर्षाची होण्याआधीच २०१८मध्ये मी ‘हिचकी’ हा चित्रपट केला होता आणि त्यानंतर आता ‘मर्दानी २’मध्ये काम केले आहे. 

एक आई आणि एक अभिनेत्री या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून काम करावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याचप्रमाणे ज्या चित्रपटांच्या कथेतून लोकांपर्यंत काही विशेष संदेश पोचेल, असे चित्रपट यापुढेही मी नक्कीच करीन. गेल्या चार ते पाच वर्षांत चित्रपटसृष्टीत बरेच बदल झाले आहेत. सध्या चित्रपटसृष्टीमधील लोकांपेक्षा प्रेक्षकच चित्रपटांवर जास्त प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांच्याकडून चित्रपटांचे कौतुकही होत आहे. आता चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहते आणि त्यांच्या आवडी-निवडींचाही विचार करत आहे. हाच चांगला बदल चित्रपटसृष्टीत या चार ते पाच वर्षांत मला दिसून आला. त्यामुळे सध्या तरी प्रेक्षकच सगळ्यात मोठा ‘किंग’ आहे.

प्रेक्षक सध्या रिअल लाइफ स्टोरीज आणि ‘बाहुबली’सारख्या भव्य-दिव्य चित्रपटांना पसंती देत आहेत. त्याचबरोबर जागरूकता घडवणारे चित्रपट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवले जात आहेत, हे पाहून फारच आनंद होतो. सध्या वेबसीरिजचाही ट्रेंड आहे. मी सध्या तरी चित्रपट करणे जास्त पसंत करीन, त्यानंतर वेबसीरिजचा विचार करीन. कोणते आणि कशा प्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज करायचे, हे मी आधीच ठरवत नाही.

‘मर्दानी’मधून आम्ही महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीत वाईट कृत्य करत आहेत, ते आपल्या आजूबाजूलाच असतात; त्यांच्यापासून सांभाळून राहा. तसेच मुलींना आणि महिलांना सुरक्षित राहण्याचा संदेश आम्ही या चित्रपटातून देत आहोत. त्या सर्व महिलांना मी एवढेच सांगेन, की डोळे-कान उघडे ठेवा, आपल्याला आजूबाजूला काय घडतेय याकडे लक्ष द्या आणि स्वतःचे संरक्षण करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com