अखेर ठरली रणरवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख; ट्विटरवर घोषणा

वृत्तसंस्था
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली असून येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे रणवीरने ट्विटरवर सांगितले आहे. बॉलिवूडचे हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी अनेक दिवसांपासूनची चर्चा आता खरी ठरणार आहे. दीपिकानेही याबाबत ट्विटरवरुन अधिकृत घोषणा केली आहे. 

मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली असून येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे रणवीरने ट्विटरवर सांगितले आहे. बॉलिवूडचे हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी अनेक दिवसांपासूनची चर्चा आता खरी ठरणार आहे. दीपिकानेही याबाबत ट्विटरवरुन अधिकृत घोषणा केली आहे. 

आमच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने आमचे लग्न 14 व 15 नोव्हेंबर 2018 रोजी होत आहे. आमच्या या सुंदर प्रवासासाठी आपल्या आशीर्वादाची कामना करतो, असे दीपिका व रणवीरने ट्विटरवर केलेल्या लग्नाच्या घोषणेत म्हटले आहे. तुम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आमचं लग्न ठरलं आहे. इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या आधारावर आमचा जो पुढील प्रवास सुरू होणार आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. अशी पोस्ट रणवीरने ट्विटरवर लिहिली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रणवीर दीपिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. पण आता रणवीर आणि दीपिका या दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणवीर आणि दीपिकाने सर्वाधिक वेळ घेतला. आपल्या लग्नात सर्व गोष्टींचं नियोजन अगदी सुरेख पद्धतीने व्हावं असाच त्यांचा अट्टहास आहे. 

हे लग्न कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे कपल इटलीत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती़ अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मान्य केलेले नव्हते. पण म्हणून सार्वजनिक ठिकाणी हे नाते अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात त्यांनी कुठलीही कसूर ठेवलेली नाही. आता मात्र, बॉलिवूडच्या या ‘बाजीराव- मस्तानी’च्या लग्नसोहळ्याविषयी चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
 

दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाल्यास रणवीर सध्या सिम्बा या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय गली ब्वॉय आणि 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित 83 या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या तख्त या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिका पद्मावतनंतर तिने दिग्दर्शिका  मेघना गुलजारचा नवा प्रोजेक्ट साईन केला आहे. मेघना गुलजार राजी, तलवार अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. राजीनंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय. यात दीपिकाची वर्णी लागली आहे. साहजिकचं या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिची ही व्यक्तिरेखा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्यापासून प्रेरित असेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer Singh Announces His Wedding With Deepika Padukone On Twitter