रणवीर सिंगचा '83' दिल्लीत टॅक्स-फ्री | 83 Movie Tax Free | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

83 movie

रणवीर सिंगचा '83' दिल्लीत टॅक्स-फ्री

अभिनेता रणवीर सिंगची Ranveer Singh मुख्य भूमिका असलेला '83' हा चित्रपट दिल्लीत टॅक्स-फ्री घोषित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. '83' हा चित्रपट 1983 च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाच्या कहाणीवर आधारित आहे. या रिअल लाईफ ड्रामामध्ये रणवीर हा कपिल देव यांची भूमिका तर त्याची पत्नी दीपिका ही कपिल देव यांची पत्नी रुमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. कबीर खान यांनी पोस्ट लिहित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे आभार मानले. (83 Movie Tax Free)

'दिल्लीत 83 हा चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिय यांचे खूप आभार. तुमच्या या निर्णयामुळे आम्ही भारताच्या सर्वांत मोठ्या विजयाची कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकू', असं कबीरने लिहिलं. हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर आणि एमी विर्क अशी कलाकारांची मोठी फौज आहे.

चित्रपटाच्या ३ मिनिटं ४९ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये दिग्दर्शक कबीर खान प्रेक्षकांना 1983 च्या काळात घेऊन जातो, जेव्हा भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. ते क्षण पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जगता येणार आहेत. भारतीय संघाचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांचं यश-अपयश या सर्व गोष्टींची झलक यातून पहायला मिळते. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सुरुवातीला हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.