लहानपणीच जुळले होते साऊथच्या रश्मिकाचे मराठीशी तार..'ऐका दाजिबा' गाण्याशी आहे खास कनेक्शन..वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandanna

Rashmika Mandanna: लहानपणीच जुळले होते साऊथच्या रश्मिकाचे मराठीशी तार..'ऐका दाजिबा' गाण्याशी आहे खास कनेक्शन..वाचा

Rashmika Mandanna:नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आता केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही भलतीच सक्रिय झालीय असं म्हणत असताना पठ्ठीनं मराठी इंडस्ट्रीचा मंचही गाजवल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

मराठी लावणीवर ठुमके लगावताना रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात रश्मिकानं लावणीवर धडाकेबाज डान्स केला आहे. त्याची छोटी झलक साऱ्यांनी पाहताच समस्त मराठीजनांचे मन जिंकून गेली ती.

बरं याच कार्यक्रमातला रश्मिकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिनं लहानपणीच आपले मराठीशी सुर जुळले होते याविषयीचा एक किस्सा सांगितला आहे.(Rashmika Mandanna Marathi love childhood memory aika dajiba song)

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना 'पुष्पा' सिनेमातील 'श्रीवल्ली' म्हणून आता महाराष्ट्रातील घराघरातही ओळखली जाते. त्यामुळेच तर रश्मिकानं आपलं मराठीशी लहानपणापासून कनेक्शन आहे असं म्हटल्यावर तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

झी मराठीच्या मंचावर बोलताना रश्मिका म्हणाली,''मराठीशी माझे सूर लहानपणीच जुळले''. आपल्या बालपणीची आठवण सांगत ती म्हणाली, ''लहानपणी मी ऐका दाजिबा गाण्यावर डान्स केला होता..त्यामुळं तेव्हाच मराठी भाषेशी माझं कलेच्या माध्यमातून कनेक्शन पहिल्यांदा जुळलं आहे. त्यानंतर इतक्या वर्षांनी मी आता लावणी करत आहे तेव्हा मला खूप मस्त वाटतंय''.

साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमध्येही सक्रिय झाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा 'मिशन मजनू', अमिताभ बच्चन सोबतचा 'गूडबाय' हे तिचे दोन सिनेमे आपल्या भेटीला आले आहेत. तर लवकरच रणबीर कपूरसोबतच्या 'अॅनिमल' सिनेमातही ती आपल्याला दिसणार आहे. आता बॉलीवूडनंतर रश्मिकानं मराठीकडे मोर्चा वळवला तर नवल नसावे.